'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' बांधकाम कामगारांना शासनातर्फे पनवेल येथे विविध लाभांचे वाटप कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध- ना.संभाजीराव पाटील- निलंगेकर



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.10 :- इमारत बांधकाम कामगारांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, आरोग्य, निवास या सुविधा पुरविण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाने २८ योजना तयार केल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार, कौशल्य विकास व उद्योजकता कामगार, भूकंप पुनर्वसन माजी सैनिकांचे कल्याण मंत्री ना.संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आज खांदेश्वर पनवेल येथे केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळा आज फोर कोर्ट एरिया, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर, नविन पनवेल येथे ना.संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, कामगार उद्योग,उर्जा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार ,कामगार आयुक्त राजीव र.जाधव,मंडळाचे सदस्य श्रीपाद कुसुरकर, अपर कामगार आयुक्त वि.के.बुवा, उपआयुक्त भ. मा.आंधळे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.पाटील-निलंगेकर म्हणाले की, राज्यात २७ लाख बांधकाम कामगार असणे अपेक्षित होते, मात्र मंडळाकडे प्रत्यक्ष नोंदणी केवळ १ लाख ४० हजार इतकीच होती. विद्यमान शासन सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटल विश्वकर्मा योजना जाहीर केली. त्यानंतर या क्षेत्रात भरीव काम करण्यास सुरुवात झाली. आता पर्यंत मंडळाने १२ लाख कामगारांची नोंद केली आहे. तब्बल ४ लाख कामगारांना प्रत्यक्ष बँक खात्यात लाभ ही देण्यात आला आहे.
पिढ्यानपिढ्या मोल मजुरी करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी, त्याच्या कुटूंबातील सदस्यांचे, त्यांचे स्वतःचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी योजना तयार केल्या आहेत. इतरांची घरे बांधणाऱ्या या कामगारांना स्वतःचे हक्काचे घर असावे, यासाठी अडीच लाख रुपये देण्याची घोषणा ही ना.निलंगेकर यांनी यावेळी केली.
शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे सरकार-पालकमंत्री ना.चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय हे शेवटच्या घटकपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे हे आहे. त्यानुसार सर्व शासन काम करीत असून शेवटच्या घटकपर्यंत पोहोचणारे हे शासन आहे. कामगारांच्या अडी अडचणीला, त्याच्या मुलांच्या शिक्षणाला, आजारपणाला हे मायबाप शासन विविध २८ योजनांचा माध्यमातून मदत करेल. कामगारांच्या पाठीशी उभे राहणारे हे शासन आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी नोंदित बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते विविध लाभ तसेच अत्यावश्यक किट व सुरक्षा किट वाटप करण्यात आले.
इमारत व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम यांनी प्रास्ताविक केले. त्यातून त्यांनी मंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. श्रीरंगम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास बांधकाम कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक