किहीम येथील महिलांचे हळदी कुंकूः लुटले वाण ‘मतदार जागृती’ अन् ‘आपत्ती व्यवस्थापना’चे


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23- सध्या संक्रांतीचे हळदी कुंकू समारंभ सगळीकडे होत आहेत. महिला वर्गाचे हे एक स्नेह मिलनच असते. या स्नेहमिलनाचे उद्देश असते ते एकमेकींना सौभाग्याचे ‘वाण’ लुटणे. किहीम येथील महिलांनी हळदी कुंकू समारंभात मतदार जागृती आणि आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीचे  ‘वाण’ लुटत वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. रिद्धी महिला मंडळ किहीम व ‘रायगडचा युवक’ या सामाजिक सेवाभावी संस्थेने या कामी पुढाकार घेत हे आयोजन केले होते.
 किहीम येथील गणपती मंदिर सभागृहात काल (दि.22) सायंकाळी हा सोहळा पार पडला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. जयदीप मोहिते हे होते. तसेच यावेळी  दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) वृषाली पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्ष रश्मी केळूस्कर,  ॲड. निलोफर  शेख, प्रणिता मगर, डॉ. ज्ञानेश्वर शेळके, तलाठी पल्लवी  भोईर, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जयपाल पाटील यांनी उपस्थित महिलांना घरातील विविध उपकरणांशी संबंधित आपत्ती व सुरक्षानिहाय माहिती दिली. तर निवडणूक शाखेच्या वतीने मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती साठी महिलांना मतदान प्रात्यक्षिक देण्यात आले. उपस्थित महिलांनी यावेळी मतदान करुन आपण दाबलेल्या चिन्हाच्या बटणानुसार  चिठ्ठी येत असल्याबाबत खात्री केली. त्यानंतर न्या. वृषाली पाटील यांनी कौटूंबिक हिंसाचार कायद्याबाबत माहिती दिली. या उपक्रमात महिलांना 108 रुग्णवाहिका उपलब्धता, घरगुती गॅस संदर्भातील सुरक्षा, तसेच विद्युत उपकरणे हाताळणी आदींबाबत माहिती देण्यात आली. न्या. जयदीप मोहिते यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  रश्मी केळूस्कर यांनी तर आभार प्रदर्शन  मंगला मोडक यांनी  केले. या कार्यक्रमास किहीम येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक