होमगार्ड नोंदणीव भरती कार्यक्रम 11 पासून घाटकोपर येथे


अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील उमेदवारांसाठी होमगार्ड सदस्य नोंद्णी व निवड कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर नोंदणी व भरती कार्यक्रम 11 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत लोहमार्ग आयुक्तालय, मुख्यालय घाटकोपर, मुंबई येथेआयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी केले आहे.
 यासंदर्भात जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्या कार्यलयाकडून प्राप्त माहितीनुसार, होमगार्ड अधिनियम 1947 मधील तरतुदीनुसार स्वयंसेवी, मानसेवी होमगार्ड संघटनेमध्ये  भारतीय नागरिक असलेल्या पुरुष व महिला नागरिकांकरिता बृहन्मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील नागरिकांकरिता नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया दि.11 ते 16 फेब्रुवारी रोजी लोहमार्ग आयुक्तालय मुख्यालय घाटकोपर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत राबविण्यात येणार आहे.  सदरची नोंदणी ही बृहन्मुंबई, ठाणे व रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच लागू आहे.  सदरचे मानसेवी सदस्यत्व 3 वर्षाचा कालावधी असून त्यानंतर इच्छा असल्यास पुढील 3 वर्षे सेवा करण्याकरिता पुर्ननोंदणी देण्यात येईल.   नोंदणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना संघटनेमार्फत विनामूल्य गणवेश पुरविण्यात येईल.  त्याचप्रमाणे पात्र उमेदवारास 35 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबीर पूर्ण करणे अनिवार्य राहील.  प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना प्रतिदिन शंभर रुपये भोजनभत्ता व पस्तीस रुपये खिसाभत्ता अनुज्ञेय असतो.  प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर होमगार्ड उमेदवारांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीकरिता सहाय्यक म्हणून आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य करणे, सार्वजनिक इमारतींचे संरक्षण करणे, राज्य शासनाकडून वेळोवेळी नेमून देण्यात येतील अशी कर्तव्य पार पाडणे इत्यादी कर्तव्यावर पाठविण्यात येईल.  कर्तव्य कालावधीत संघटनेमार्फत होमगार्डना प्रचलित दराने प्रतिदिन तीनशे रुपये कर्तव्यभत्ता व 10 तासापेक्षा जास्त कर्तव्य केल्यास 100 रुपये  उपहारभत्ता अनुज्ञेय राहील.
            होमागार्ड संघटनत सदस्य झाल्यानंतर सलग 3 वर्षाच्या कालावधीत बंदोबस्त  व कवायतीवर किमान 40 टक्के उपस्थिती असल्यास त्यांना शासनाने निर्धारित केलेल्या विभागांमध्ये नोकरीकरिता 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येतो.  होमगार्ड कर्तव्य बजावित असताना मृत्यू किंवा विकलांगता आल्यास अशा सदस्यास लोकहितैषी निधीमधून त्यांना आर्थिक मदत अनुज्ञेय असते. 
            नोंदणी व पात्रतेचे निकष व अटी : शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण, वय 20 ते 50 वर्षे.  पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे व गोळाफेक (7.260 कि.ग्रॅ.)  तसेच महिलांसाठी 800 मीटर धावणे व गोळाफेक (4 कि.ग्रॅ.) या मैदानी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक.  उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित राहील.  उमेदवारांनी खालीलप्रमाणे मूळ कागदपत्रे व त्याचे प्रत्येक 2 छायाकिंत प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.  पासपोर्ट साईज फोटो, जन्म दाखला किंवा शाळा सोडलयाचा दाखला, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा (रेशन कार्ड, आधार कार्ड), 10 वी उत्तीर्ण शालांत प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना  फक्त जड वाहनचालक असल्यास, माजी सैनिक असल्यास सैनिक बोर्ड ओळखपत्र व डिस्चार्ज कार्ड, एन.सी.सी. किंवा सी प्रमाणपत्र असल्यास, आय.टी.आय.प्रमाणपत्र असल्यास, खेळाडू (किमान जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग), शासकीय, निमशासकीय खाजगी आस्थापनांमध्ये काम करीत असल्यास कार्यालय प्रमुखांचे अथवा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील, नागरी संरक्षण सेवेत असलेले परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र.  बेरोजगार उमेदवारांनाही सदर नाव नोंदणीमध्ये सहभागी होता येईल.  सदर नोंदणी नि:शुल्क असून कुठलीही शिफास विचारात घेतली जाणार नाही, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड