लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 2 व 3 मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अर्थात मतदार प्रशिक्षण व सहभागीता कार्यक्रमांतर्गत (VVIP) Voter Verification and Information Programme अर्थात ‘मतदार पडताळणी व माहिती कार्यक्रम’ व्यापक पद्धतीने राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुचना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने शनिवार दि.2 व रविवार दि.3 मार्च रोजी  मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी निवडणूक  वैशाली माने यांनी दिली.
निवडणूक प्रक्रिया व तत्संबंधी माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती माने यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या म्हणाल्या की, SVEEP अंतर्गत VVIP राबवितांना यात सर्व नागरीकांमध्ये मतदार यादीतील नाव व तपशिल तपासणे, मतदार यादीत नाव नसल्यास त्याची नोंद करणे, एकापेक्षा अधिक नोंदी असतील, मयत व स्थलांतरीत असतील तर त्यांची वगळणी करणे, हेल्प लाईन नंबर व NVSP पोर्टलच्या सेवांबाबत स्वत:ला अवगत करुन घेणे इ. बाबत जागृती निर्माण करण्यात येणार आहे. याअंतर्गत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरीकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांनी शनिवार दि.2 व रविवार दि.3 मार्च या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम /कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार, सर्व मतदान केंद्रावर/मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासणीसाठी दिनांक 01/01/2019 या अर्हता दिनांकावर प्रसिध्द करण्यात आलेली अंतिम मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या विशेष मोहिमेमध्ये दिव्यांग पात्र लोकांची मतदार म्हणून नोंदणी करणेबाबत तसेच 18 ते 19 वयोगटातील नोंदणीचे प्रमाण वाढविणेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी. मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते त्यामुळे मतदारांनी त्यांचेकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव आहे की नाही? याची तपासणी करावी. तसेच सर्व राजकीय पक्षांनीही आपले मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (BLA) यांची नेमणूक करुन सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत अवगत करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            मा. भारत निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर (District Contact Centre) दिनांक 25 जानेवारी, 2019 पासून कार्यान्वित करण्यात आले आहे.  त्यासाठी 1950 हा टोल फ्रि क्रमांक देण्यांत आलेला आहे. तरी सर्व नागरीकांनी 1950 चा जास्तीत जास्त वापर करुन मतदार यादीतील नावाबाबत खात्री करुन घ्यावी.  याशिवाय जिल्ह्यात मतदार साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच इ. स्थापन करण्यात आले आहेत. त्याद्वारेही मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील  सर्व नागरीकांनी या उपक्रमात सहभागी होऊन मतदार यादी अचूक करणेसाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांनी केले आहे.
 यावेळी पत्रकारांना cVIGILव nvsp या मतदारांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेले मोबाईल ॲप व पोर्टल यांची माहितीही सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक