प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा शुभारंभ : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवावा- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी



अलिबाग,जि.रायगड, दि.18(जिमाका)-  केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत पात्र शेतकऱ्यांनी आपल्या परिचयातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
            देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिकुटूंब सहा हजार रुपये वार्षिक सन्माननिधी देण्याच्या  प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा आज देशभरात शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधल्या  गोरखपूर येथून या योजनेचा शुभारंभ केला. यानिमित्त रायगड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे व मुख्य सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी संवाद साधला.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा  अधिक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर,  कृषी उपसंचालक  तानाजी पावडे,  तालुका कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी , तंत्र अधिकारी दीपाली अडसूळ, गणेश बांभळे, एनआयसीचे निलेश लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून प्रातिनिधीक स्वरुपात 50 शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते. या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शेळके यांनी प्रास्ताविकात प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
            आपल्या भाषणात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जे जे शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्या त्या शेतकऱ्यांनी या योजनेची माहिती आपल्या जवळच्या पात्र शेतकऱ्या पर्यंत पोहोचवा. जेणेकरुन त्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल.  रायगड जिल्ह्यात 88 ते 90 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. शिवाय बहुतेक शेतकरी हे एक पिकपद्धतीचाच वापर करतात.  अशा सर्व शेतकऱ्यांना ऐनवेळेचा आर्थिक आधार म्हणून ही योजना अधिक लाभदायक आहे. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेती करतांना  एकात्मिक पिक पद्धतीचा अवलंब करावा. तसेच शेतीला अन्य पूरक जोडधंदा सुरु करावा,असेही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले.  घरची शेती असतांना शहरात जाऊन कुठे तरी नोकरी करण्यापेक्षा  शेतीत नोकरी इतके कष्ट केले तर अधिक उत्पन्न मिळेल.  जिल्हा प्रशासनाच्या मदतीने रायगड जिल्ह्यातून मुंबईत नोकरीसाठी स्थलांतरीत झालेले शेतकरी   पुन्हा परत येऊन शेतीकडे वळत आहेत, ही आनंदाची बाब आहे असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सामुहिक अर्थात गटशेतीकडे वळावे, त्यामुळे साऱ्यांनाच आर्थिक उत्पन्नाचा लाभ होईल, यासाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहाय्य करेल, असेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
            यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 4 हजार 542 कुटूंब या योजनेसाठी पात्र ठरले असून त्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात आली आहे.  पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करुनअपलोड करण्याचे काम अद्याप सुरु असून येत्या 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभाचा पहिला हप्ता थेट बॅंक खात्यात अदा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार क्रमांक, बॅंक खाते पासबुक व मोबाईल क्रमांक या तीन बाबींची माहिती देणे आवश्यक आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
            याप्रसंगी  प्रधामंत्र्यांच्या मन की बात कार्यक्रमाचे तसेच उत्तरप्रदेशात गोरखपूर येथे झालेल्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण सर्व उपस्थीतांना कार्यक्रम स्थळी पाहीले. ‍
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना : शेतकऱ्यांना  उत्पन्न मिळण्याकरिता  केंद्र शासनाने  प्रधानमंत्री किसान  सन्मानिधी योजना सुरु केलेली आहे.   अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटूंबाला  प्रतीवर्षी रुपये ६००० इतके आर्थीक सहाय्य तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.   उद्देश : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ‍  निश्चीत  उत्त्पन्न मिळण्याकरीता मदत म्हणून शेतकऱ्यांच्या कृषी निष्ठा (खते बीयाणे कीटकनाशके) खरेदी करण्याकरीता लागणारी आर्थीक गरज भागविण्याकरीता आणी पिकांची योग्यनिगा राखून फायदेशीर ऊत्पन्न ‍ मिळावे याकरीता ही योजना आहे.   अल्पभूधारक शेतकरी म्हणजे यांची जमीन दोन हेक्टर (पाच एकर) पर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ आहे.
            लाभार्थी निवडीच्या अटी व शर्ती : पंतप्रधान किसान हे केंद्र सरकारच्या योजनेतून शंभर टक्के निधी देणारी योजना आहे.  १.१२.२०१८  पासून ते कार्यरत झाले आहे.  या योजनेअंतर्गत तीन समान  समान हप्त्यांमध्ये दरवर्षी रु.६००० चे उत्पन्न सहाय्यक शेतकऱ्यांना देण्यात येईल जे जमीन धारक दोन हेक्टर पर्यंत मालकीचे असतील. पती, पत्नी आणी अल्पवयीन मुलांसाठी या योजनेसाठी कुटूंबाची व्याख्या आहे.  राज्य सरकार आणी केंद्रशासीत प्रदेश शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार लाभ देण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबांची निवड करतील. निधी थेट  लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत केला जाईल. 
उत्तर प्रदेशातरील गारेखपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सन्माननिधी ऑनलाईन वितरीत केला  आणी लगेचच जिल्हाधीकारी कार्यालयात राजस्व सभागृहात जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळ्यात सहभागी झालेले शेतकरी मदन दामोदर म्हात्रे, रा.झीराडपाडा ता.अलिबाग यांच्या मोबाईलवर दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आणी त्यांचा चेहरा आनंदाने उजळला.
००००००



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक