प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करुन  दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी शुक्रवार दि. 8 पासून गावनिहाय शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. रविवार दि.10 तारखेपर्यंतमाहिती संकलनाचे काम पूर्ण करावे व जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
केंद्र शासनाच्या  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी  धारण क्षेत्र असलेल्या अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्याकरिता प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष रु. 6,000/- इतके आर्थिक सहाय्य 3 टप्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  या संदर्भात राज्य शासनाने कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत  परिपत्रक जारी करुन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना(PM-KISAN) ही ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकुण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना अनुज्ञेय असल्याचे जाहीर केले आहे. ही योजना रायगड जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. त्या करीता या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यासंदर्भात सर्व संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी आदींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती.
 या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.
 यावेळी या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला. त्यानुसार दि. 5 व 6 रोजी  या योजनेची प्रसिध्दी करण्यात येईल. त्यानंतर  दि. 6 रोजी तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळाधिकारी (कृषी व महसुल),  नायब तहसीलदार व संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे योजना अंमलबजावणी संदर्भात उपविभागीय अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी हे प्रशिक्षण घेतील.दि. 7 ते 10 दरम्यान गावनिहाय पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी तयार करुन, तपासून खात्री करण्यात येईल. दि.10 ते 12 दरम्यान  कुटुंबनिहाय वर्गीकरण करण्यात येईल, गोळा होणारी माहिती ही दि. 7 ते 15 दरम्यान  परिशिष्ट अ मध्ये संगणीकृत  माहितीचे संकलन केले जाईल, ही माहिती 15 ते 20 दरम्यान गावात प्रसिद्ध करुन  त्यावर हरकती मागविण्यात येतील. दि.20 व 21 रोजी काही दुरुस्ती असल्यास यथायोग्य दुरुस्ती करुन पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबाची अंतिम यादी  तहसील कार्यालयात संगणकीकृत स्वरुपात सादर केली जाईल. दि.22 ते 26 या कालावधीत तहसिल स्तरावर प्राप्त यादीची तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी करुन संगणीकृत माहिती महाऑनलाईने उपलब्ध  करुन दिलेल्या संकेतस्थळावर पडताळणी (Validate) करुन तसेच केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.
 रायगड जिल्ह्यातील दोन हेक्टर पेक्षा कमी धारण क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी गावपातळीवर तलाठी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच गावात होणाऱ्या शिबिरात सहभागी होऊन माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक