मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपुजन अलिबागचे प्रशिक्षण केंद्र आदर्शवत ठरावे- ना. महादेव जानकर



 अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका)- महाराष्ट्राला 720 कि.मी चा सागरी किनारा लाभला असतांनाही आपण अन्य राज्यांच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात मागे आहोत. मत्स्य उत्पादनातून मच्छिमार बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रोजगारनिर्मितीला चालना देणारे क्षेत्र म्हणून शासन मासेमारी क्षेत्राकडे पाहते, त्यादृष्टीने अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत ठरावे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय  मंत्री ना. महादेव जानकर यांनी आज येथे केले.
शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अलिबाग येथील नियोजित मत्स्य व्यवसाय  प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन आज ना. जानकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
अलिबाग येथे कोळीवाडा परिसरात मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे, सह आयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक, कार्यकारी अभियंता आर.एस. मोरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय युवराज चौगले,रायगडचे सह आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार, वर्सोवा मत्स्य  व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहशतवादी हल्ल्यात पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कोनशीला अनावरण व कुदळ मारुन भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आपल्या भाषणात ना. जानकर म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विकास या विभागाला कृषीचा दर्जा मिळावा या साठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी केंद्राने निधीही वाढवून दिला आहे. त्यादृष्टीने राज्यात मच्छिमारांच्या सुविधांच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. राज्यात 456 मच्छिमार गावे असून त्यातील 81 हजार 400 कुटूंबे हे मच्छिमारीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. या पारंपारिक मासेमारी करणाऱ्यांना मासेमारीचे आधुनिक प्रशिक्षण मिळाले तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास ना. जानकर यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राचा मत्स्यउत्पादनात देशात सातवा क्रमांक होता तो या वर्षी 4 था आला आहे.  त्यासाठी मच्छिमार जेट्टींची संख्या वाढविणे, केज फिशरीला चालना देणे, तसेच प्रशिक्षण देणे या गोष्टींना चालना देत आहोत.  मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या युवकांना अन्य तांत्रिक बाबींचेही कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यादृष्टीने अलिबाग येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. जानकर यांनी यावेळी सांगितले. तसेच मच्छिमारांच्या विविध मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील यांनीह मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह आयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक यांनी केले. तर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राबाबत व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी दिली. तर सह आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रतीम सुतार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक