लोकसभा निवडणूक- 2019 आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर-जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 :-  लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता दि. 10 मार्च पासून लागू झाली आहे. ही निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडतांनाच आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर  भर राहिल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले.
लोकसभा निवडणूक 2019 च्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पद्मश्री  बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, रायगड लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि.28 मार्च, 2019 रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि.4 एप्रिल, 2019 असा आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी शुक्रवार दि. 5 एप्रिल, 2019 रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक सोमवार दि.8 एप्रिल, 2019 असा आहे. मतदान मंगळवार दि. 23 एप्रिल, 2019 रोजी होणार असून मतमोजणी गुरुवार दि. 23 मे, 2019 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक सोमवार दि.27 मे, 2019 असा आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर करावयाची कार्यवाही याबाबत माहिती दिली ती पुढील प्रमाणे-
संपत्तीचे विद्रुपीकरण :- शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण यामध्ये शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होर्डिंग/बॅनर/झेंडे इत्यादी निवडणूका जाहिर झाल्यानंतर 24 तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करणे
शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर :- सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होर्डिंग/बॅनर/झेंडे इत्यादी आणि सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बसेस, इलेक्ट्रीक/टेलिफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून 48 तासात काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करणे.
  खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण :- खाजगी संपत्तीवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून 72 तासांमध्ये काढून टाकण्याबाबत कार्यवाही करणे.
 शासकीय वाहनांचा दुरुपयोग :- निवडणूक जाहिर झाल्यापासून 24 तासामध्ये राजकीय पक्ष, उमेदवार, किंवा अन्य निवडणूकांचा प्रचार, प्रसार अथवा निवडणूकीसंबंधी कामकाजासाठी शासकीय वाहनांचा उपयोग करण्यासाठी संपूर्ण बंदी करण्याबाबत कार्यवाही करणे.
 सार्वजनिक निधीच्या खर्चांवर जाहिरात :- निवडणूक जाहिर झाल्यानंतर सार्वजनिक निधीच्या खर्चांवर जाहिरात करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती तात्काळ बंद करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना. 
शासकीय संकेतस्थळावरील राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो :- निवडणूका जाहिर होताच शासकीय संकेतस्थळावरुन राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो तात्काळ काढून टाकण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना.
विकास/बांधकाम क्षेत्रातील गतीविधी :- निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासामध्ये जिल्ह्यातील खालील बाबतीत आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारी मान्य करण्यासाठी यादी प्राप्त करुन घेणे. प्रत्यक्ष कामाची सुरुवात झालेल्या कामांची यादी, प्रत्यक्ष कामाची सुरुवात न झालेल्या कामांची यादी.
निवडणूक खर्च देखरेख आणि आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणी याबाबतची कार्यवाही :- फ्लाईंग स्क्वॉड, FST, Video Team दारु/रोकडे/प्रतिबंधीत औषधे यांची सखोल तपासणी, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध औषधे/नशीले पदार्थांच्या वाहुतकीसंदर्भात फ्लाईंग स्क्वॉड इत्यादी तात्काळ कार्यान्वित करण्यात आली.
तक्रार देखरेख यंत्रणा :- निवडणूका जाहिर झाल्यापासून 24 तासाच्या आत मध्ये तक्रार यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावीत.
IT Applications: - निवडणूका जाहिर होताक्षणी अधिकृत संकेतस्थळांसह IT Applications आणि सोशल मिडिया तात्काळ कार्यान्वित करण्यात आली आहे.
मतदार व राजकीय पक्षांच्या जागृतीसाठी  माहितीचे प्रसारण करणे :- निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींची जाहिरात करण्यात यावीत. रेडिओ, टि.व्ही. दुरचित्रवाणी सिनेमागृहे, शासकीय वाहिन्या यांच्यावरुन मतदार शिक्षण साम्रगीचे प्रसारण करण्यात यावेत.
शैक्षणिक व खाजगी संस्थाकडून सक्रीय सहकार्य :- निवडणूक विषयक माहिती सर्व सामान्य नागरीक व सर्व संबंधितापर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक व खाजगी संस्थाकडून सक्रीय सहकार्य घेण्यात यावेत.
माध्यम केंद्र :-  मतदार, राजकीय पक्ष व सर्व संबंधितांमध्ये EVM/VVPAT सह निवडणूक यंत्रणेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी माध्यम केंद्राचा उपयोग करण्यात यावेत.
MCMC/DEMC :- राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
नियंत्रण कक्ष :- जिल्हा स्तरावर 24X 7 कक्ष तात्काळ स्थापन करण्यात यावा व त्यासाठी पुरेशा प्रमाणात मुनष्यबळ आणि अन्य साहित्य उपलब्ध करुन देण्यात यावे.
जिल्ह्यातील निवडणूक शांततेच्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी  आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी तसेच मतदारांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
दरम्यान आजच या पत्रकार परिषदेपूर्वी  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांनाही  निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात माहिती देण्यात आली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक