लोकसभा निवडणूक २०१९ नियम भंग करणाऱ्या प्रिंटर्सला सहा महिन्यांची शिक्षा उमेदवार, मुद्रणालयांच्या चालक मालकांनी सहकार्य करावे



अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका)-:- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्रण साहित्य व फ्लेक्स लावताना निवडणूक काळामध्ये घ्यावयाच्या काळजीचे व कायद्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सवर सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधितांनी या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे कार्यात कायदेशीर तरतूदीचे पालन करुन  निवडणूक कामाला सहकार्य करावे असे आवाहन रायगडचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  डॉ विजय सूर्यवंशी  यांनी केले आहे.
वरील कलमाच्या कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्यास सहा महिन्यांपर्यंत शिक्षा असू शकेल इतक्या कारावासाची किंवा दोन हजार रुपयापर्यंत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल. त्यामुळे राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांच्या चालक मालकांनी यांची नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.        
            लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 127-अ आणि त्याव्दारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत यांच्याकडे सर्व राजकीय पक्षाचे,  निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकाचे लक्ष वेधण्यात आले.
            उक्त कलमान्वये प्रथम असे विहीत करण्यात आले आहे की, हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र , हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भिंतीपत्रक यांच्या दर्शनी भागावर  मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नांव व पत्ता प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. असा कोणताही पत्रक मुद्रकांने इच्छुक प्रकाशकाकडून  त्यांनी  स्वत: स्वाक्षरीत केलेले आहे, त्या व्यक्तिला व्यक्तिश: ओळखतील अशा  दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या  त्या प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र (दोन प्रतीमध्ये) घेणे अत्यावश्यक केले आहे.
            दस्तऐवज  छापण्यात आल्यावर तसेच मुद्रकांने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रक इत्यादींच्या चार प्रती ते पत्रक राज्याच्या राजधानीवर ठिकाणी  छापण्यात आले असेल तर मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांकडे आणि इतर कोणत्याही प्रकरणी दस्ताऐवज जेथे छापण्यात आले असेल त्या जिल्हयाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे 3 दिवसाचे आत सादर करण्यात यावे. त्यासोबत छपाई केलेल्या पत्रकासाठी  किती  मोबदला घेतला याबाबत ठराविक प्रपत्रात  माहिती देण्यात यावी.
00000
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग
दुरध्वनी 02141-222019


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक