आचारसंहिता भंगाबाबत आत्तापर्यत ४  गुन्हे दाखल;
२६ हजार लिटर दारू, सोने जप्त
------------------
पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल
-----------------------
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांची पत्रकार परिषद

रायगड-अलिबाग दि २८:  आजपासून ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील एका जागेसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज सादर केले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली. आजपासून नवी दिल्लीहून खर्च निरीक्षक निलंक कुमार नियुक्त झाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. आचारसंहिता भंगाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईत २६ हजार ३६१ लिटर दारू तर १४७१ ग्राम सोने जप्त करण्यात आल्याचेही ते म्हणाले.जप्त सोन्याची किंमत ४२ लाख ७१ हजार रुपये आहे तर २ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.   
या पत्रकार परिषदेस सहायक निवडणूक अधिकारी शारदा पोवार आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने देखील उपस्थित होत्या 
दोन उमेदवारांचे तीन अर्ज
आज नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज सादर केले.
 श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष) आणि अनंत गंगाराम गीते (शिवसेना) अशी या उमेदवारांची नावे आहेत.
छाननी ५ एप्रिल रोजी
उमेदवारांना किंवा त्यांच्या सूचकाना नामनिर्देशनपत्रे ही गुरुवार ४ एप्रिल २०१९ पर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत  निवडणूक निर्णय अधिकारी,  किंवा श्रीमती शारदा पोवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (अलिबाग उपविभागीय अधिकारी) यांच्याकडे ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी रायगड यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे दाखल करता येईल.
 नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार ५ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता राजस्व सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी रायगड यांचे कार्यालय याठिकाणी होईल.
उमेदवारांना सोमवार ८ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
मंगळवार २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी असेल



६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
३२ रायगड  लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी तर ६ विधानसभा मतदारसंघांत ६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. प्रतिमा पुदलवाड, पेण; शारदा पोवार, अलिबाग; प्रवीण पवार,श्रीवर्धन; विठ्ठल इनामदार,महाड; नितीन राऊत, दापोली; अविशकुमार सोनोने, गुहागर अशी त्यांची नावे आहेत
खर्च निरीक्षकांनी घेतला आढावा
३२ रायगडसाठी आजपासून खर्च निरीक्षक श्री  निलंक कुमार,  (नवी दिल्ली)  याठिकाणी नियुक्त झाले आहेत. सहायक खर्च निरीक्षकांनी त्यांची कामे यापूर्वीच सुरू केली आहेत. खर्च निरीक्षकांनी आज आढावा घेतला असून उद्यापासून प्रत्यक्ष अधिकारी व पाठकांस्म्वेत त्यांच्या बैठका सुरु होतील अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
मतदार संख्या
३२ रायगड लोकसभा मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ नुसार एकूण मतदार संख्या १६ लाख ३७ हजार ८५३ इतकी असून त्यात पुरुष ८ लाख ३ हजार ८५ आणि महिला ८ लाख ३४ हजार ७६७ इतकी आहे. एकूण सर्व्हिस व्होटर्स १३१२ आहेत. तृतीयपंथी केवळ १ मतदार नोंदणी  आहे.
दिव्यांग मतदार
एकूण दिव्यांग मतदार संख्या १५ हजार ३९५ असून सर्व मतदान केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.
सर्व मतदान केंद्रांमध्ये सोयी
सर्व मतदान केंद्रांमध्ये फर्निचर, पुरेशी प्रसाधनगृहे, वीज, मदत करण्यासाठी पथक, वैद्यकीय कीट अशा सोयी तसेच मतदारांबरोबरच्या लहान मुलांचा सांभाळ करण्याची व्यवस्था या सुविधा आहेत. 
मतदान केंद्रे
३२- रायगड  लोकसभा मतदार संघात २१६२ इतकी मतदान केंद्रे आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रे खालीलप्रमाणे
पेण-  ३७४अलिबाग- ३७१ श्रीवर्धन-३४६   महाड-३८९  दापोली-३६१ , खेड- ३२१
पुरेशी मतदान यंत्रे
निवडणुकीसाठी पुरेशी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. व्हीव्हीपॅटसंदर्भात सातत्याने जनजागृती सुरु असून आत्तापर्यंत ४२०७ ठिकाणी आम्ही आमच्या चित्ररथाद्वारे जाणीव जागृती केली आहे. जिल्ह्यात १५ वाहने यासाठी विविध तालुक्यांत फिरत होती. सुमारे २ लाख लोकांपर्यंत आम्ही पोहचलो असेही जिल्हाधिकारी म्हणाले.                                                 
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी
आचारसंहिता भंगाबाबत आत्तापर्यत ४  गुन्हे दाखल झाले आहेत. सार्वजनिक मालमत्तेच्या  ठिकाणी लावलेले ६५५ फलक आदि काढून टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ३१३ ठिकाणी खासगी मालमता विद्रूप करणारी फलक व पोस्टर्स काढून टाकले आहेत.
३२० जणांवर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे तर आणखी १४९ जणांवर ते बजावण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारतीय दंडविधानांतर्गत १०८१ प्रकरणे नोंद करण्यात आले आहेत. ८३८ परवाना शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत.
--------------------

लोकसभा निवडणुकीसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तिका

रायगड-अलिबाग दि २८: रायगड जिल्हा माहिती कार्यालयाने लोकसभा मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर एक उपयुक्त संदर्भ पुस्तिका तयार केली असून आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी त्याचे विमोचन केले. सहायक निवडणूक अधिकारी शारदा पोवार आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने देखील उपस्थित होत्या.
या पुस्तिकेत १९५२ पासून ते २०१४ पर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा तपशील देण्यात आला आहे. याशिवाय निवडणूक यंत्रणेतील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांचे  दूरध्वनी व मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत तसेच सर्व नोडल अधिकारी, महत्वाची संकेतस्थळे, मतदारांसाठी आवश्यक ती माहिती, आदर्श आचारसंहिता, निवडणूक विभागाचे मोबाईल एप, व्हीव्हीपॅटविषयीची माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तिकेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी तर छायाचित्रण धनंजय कासार यांचे व सहाय्य विठ्ठल बेंदूगडे यांचे आहे.      

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक