खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक 2019 : 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन : उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांपर्यंत सुविधा पोहोचवा- ना.चव्हाण




अलिबाग,जि. रायगड,दि.29 (जिमाका):- यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेता यावे व उत्पादन वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवा,असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.
जिल्ह्याची सन 2019 च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील , जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जि. प. उपाध्यक्ष ऍड आस्वाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुभाष म्हस्के, आरसीएफ चे विपणन अधिकारी एस आर काटकर, जिल्हा अग्रणी बँकेचे आनंद निंबेकर, महावितरण चे अधीक्षक अभियंता डी आर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या नियोजनात जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर भात पिकाच्या लागवडीचे नियोजन असून यंदा 1 लाख 4 हजार 600 हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली असेल. त्याखालोखाल 6 हजार 755 हेक्टर वर नागली, 4 हजार 600 हेक्टर वर इतर तृणधान्य, 1400 हेक्टर वर तूर, 1040 हेक्टर वर इतर कडधान्य असे एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. या खरीप पिकांच्या पेरणी नंतर उत्पादन वाढीसाठी 24 हजार 860 मे.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून ही खत उपलब्ध आहेत,असेही सांगण्यात आले. तसेच पिकांवरील रोगराई निवारणासाठी 6 हजार 197 लिटर कीटकनाशके व बुरशीनाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे. बियाणे व अन्य कृषी निविष्ठा वर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन तर प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे एकूण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
भातपिकासाठी पिककर्ज
कृषी आयुक्तालयाने भात पिकाकरिता 49 हजार रुपये प्रति हेक्टरी पिककर्ज दर ठरविला आहे.संकरित व बासमती भाताकरिता 55 हजार 100 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित केले आहेत. तर जिल्हास्तरीय समितीने सर्वप्रकारच्या भाताकरिता 55 हजार रुपये प्रति हेक्टरी कर्जदार मंजूर केला आहे,अशी माहिती देण्यात आली.
उत्पादन वाढीसाठी शेतीशाळा
सन 2019-20 मध्ये भातपिकवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन (क्रॉप सॅप) अंतर्गत शेतीशाळा भरविण्यात येत आहेत. रोहिणी पंधरवाडा ते मृग नक्षत्र कालावधीत या शेतीशाळा जिल्ह्याभरात 276 कृषी सहायकामार्फत किडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन अंतर्गत निवड केलेल्या गावामध्ये भरविल्या जात आहेत.
या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शेळके यांनी सादरीकरण केले.
पूरक माहिती
रायगड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 6 लक्ष 86 हजार 892 हेक्टर इतके आहे. त्यात पिकाखालील निव्वळ क्षेत्र 2 लाख 1 हजार 322 इतके असून 1 लाख 48 हजार 694 हेक्टर क्षेत्र जंगला खाली आहे. शेतीसाठी उपलब्ध क्षेत्रापैकी खरीप हंगामात साधारणपणे 1  लाख 41 हजार 200  हेक्टर वर लागवड होते तर 21 हजार 100 हेक्टर वर रब्बी व सुमारे 7 हजार हेक्टर वर उन्हाळी हंगामातील पिकांची लागवड होते.
जिल्ह्यात गोजातीय जनावरे 4 लाख 5 हजार 840 इतके आहेत.म्हैसवर्गीय जनावरे 1 लाख 26 हजार 686 आहेत. तब्बल 1 लाख 25 हजार 89 शेळ्या मेंढ्या असून इतर जनावरे 4 हजार 753 असून जिल्ह्यात एकूण 6 लाख 62 हजार 368 पशुधन आहे. या पशुधनासाठी वार्षिक 1 लाख 25 हजार 620 मे.टन चाऱ्याची आवश्यकता असून 1 लाख 37 हजार 848 मे.टन चाऱ्याची उपलब्धता आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 3201.2 मि.मी असून गेल्यावर्षी 2796 मि. मी. इतके म्हणजेच 87.34 % पर्जन्यमान झाले होते.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक