भात खरेदी केंद्र आढावा बैठक : भात खरेदीसाठी शेतकऱ्यांशी करार करा- ना.चव्हाण : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी फिरते भात खरेदीकेंद्रांचा प्रस्ताव



अलिबाग,जि. रायगड,दि.29 (जिमाका):- यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या भात पिकाची हमीभावाने जास्तीत जास्त खरेदी व्हावी व शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांसोबत शासनाने करार करावा, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिले. तसेच शेतकऱ्यांकडून भात खरेदीसाठी फिरते भात खरेदी केंद्राचा प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यातील भात खरेदीसंदर्भात आज ना.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील , जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जि. प. उपाध्यक्ष ऍड आस्वाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुभाष म्हस्के, आरसीएफ चे विपणन अधिकारी एस आर काटकर, जिल्हा अग्रणी बँकेचे आनंद निंबेकर, महावितरण चे अधीक्षक अभियंता डी आर पाटील यांनी आदी उपस्थित होते.
यावेळी ना.चव्हाण म्हणाले की, रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर भात उत्पादन होते.मात्र शेतकरी हा भात हमी भावाने शासनाला विकण्याऐवजी कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना विकतात. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडे उत्पादित भात पीक हे शासनाच्या हमी भाव केंद्रावर खरेदी करण्याबाबत करार करण्याबाबत उपाययोजना करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळेल. तसेच शेतकऱ्यांना आपला माल थेट विकता यावा यासाठी फिरते भात खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्तावही पाठवावा, असे निर्देशही ना.चव्हाण यांनी यावेळी दिले.
000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक