जिल्ह्यात 3271 शाळांमध्ये मिळणार 11 लाख 35 हजार मोफत पाठ्यपुस्तके



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3-  समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते  इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 11 लाख 35 हजार 119 मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार असून  17 जून या शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी  विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील ,अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे यांनी  दिली आहे.
 कोणत्याही बालकाचे शिक्षण हे पुस्तकाअभावी वंचित राहू नये,  तसेच सर्व दाखलपात्र मुलांची शाळांमध्ये 100 टक्के  उपस्थिती टिकवून गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना  सुरु करण्यात आली आहे. इयत्ता पहिले ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. रायगड जिल्ह्यात  11 लाख 35 हजार 119 पाठ्य पुस्तके शासनातर्फे मोफत पुरविण्यात येणार आहेत.  रायगड जिल्ह्यातील 3271 शाळांना या योजनेचा लाभ होणार असून मराठी, उर्दू,  हिंदी, गुजराती व इंग्रजी अशा माध्यमांतील शाळांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना ही पुस्तके मोफत वाटप होतील.
या पुस्तकांच्या वाहतुकीसाठी विभागीय पाठ्यपुस्तक भांडार पनवेल ते तालुकास्तरापर्यंत  प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे  यांनी वाहतुकदार निश्चित केलेला आहे. त्यामार्फत ही वाहतुक होईल. तसेच तालुकास्तर ते शाळास्तरापर्यंतची वाहतुक  ही संबंधित तालुकास्तरावरुन होणार आहे. शाळा सुरु होण्याच्या सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके मुख्याध्यापकांच्या ताब्यात असतील. संपर्क पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक 17 जून या दिवशी म्हणजे शाळा उघडण्याच्या दिवशी पुस्तके मोफत देण्यात येतील, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रायगड जिल्हा परिषद अलिबाग श्रीमती दराडे यांनी कळविले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक