कंत्राटी कामगार व प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री रविंद्र चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन  राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित मौजे रासळ येथील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत  ते बोलत होते.
            यावेळी आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, आ.मनोहर भाईर, आ.बाळाराम पाटील,  प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), श्रीमती वैशाली माने आदि उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, की रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या असलेल्या अडीअडचणी जाणून घेऊन कंपनी व्यवस्थापनाने त्यांना योग्य त्या सुविधा देऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले.  कंपनी व्यवस्थापनाला पुरविण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित न होता नियमित पुरवठा करण्यासाठी विद्युत विभागाला सूचित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            तद्नंतर पालकमंत्री महोदयांनी एचओसी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसदर्भातील आढावा घेऊन एचओसी प्रकल्प होत असलेल्या परिसरात असलेल्या आठ गावांचा बायोमॅट्रिक पध्दतीने सर्व्हे करावा, अशा सूचना संबंधित कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.   बायोमॅट्रिक पध्दतीने  सर्व्हे केल्यामुळे त्या परिसरात राहत असलेल्या  नागरिकांच्या असलेल्या समस्यांचे निराकरण होईल.  या प्रकल्पाच्या व्यवस्थेमुळे रोजगार निर्मिती होणार आहे.  त्यामुळे एचओसी मध्ये जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी अशा सूचनांही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.   या परिरातील गावात राहत असलेल्या नागरिकांच्या अजून काही अडीअडचणी असतील तर त्या पालकमंत्री या नात्याने शासन स्तरावरुन सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. 
            या बैठकीला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक