शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज रायगड



किल्ले रायगड, ता. महाड, जि.रायगड,दि.6 (जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी उपस्थित हजारो शिवप्रेमींनी केलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुर्गराज रायगड दुमदुमला.
शिवकाळात घेऊन जाणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या सोहोळ्याला राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण,माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, किल्ले रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे, बल्गेरियाचे राजदूत एलेनोरा दिमित्रोवा, तुनुशियाचे राजदूत नेजमेद्दिन लाखाल, पोलंड दूतावास सल्लागार दामियान इरझिक व श्रीमती इव्हा स्टॅकिन्किझ, चिन दुतावासाचे सल्लागार ल्यू बिंग आणी डॉ. संग झिंपू आ.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी,शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सर्वत,महाडचे प्रांताधिकारी इनामदार, तहासिलदार पवार, नायब तहसिलदार कुडल आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहोळ्यामध्ये छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान छत्रपती संभाजीराजे युवराज शहाजी यांचे समवेत उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी आवदड यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी छत्रपती संभाजीराजे यांनी स्विकारली आहे.
यावेळी बोलतांना छत्रपती संभाजी राजे  रायगडावरील जतन संवर्धन व विकास कामांबद्दल माहिती देतांना म्हणाले की, किल्ले रायगडावरील १२०० एकर जागेत ८४  छोटेमोठे तलाव असून यापैकी २२ तलाव ( टाक या ) मधील गाळ काढण्यात आला आहे गंगासागर व हत्तीतलावातील गाळ काढण्यात आला असून येत्या दोन वषात हे सर्व तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असतील. या  शुध्द पाण्याचा पुरवठा २१ गावांना करण्याची योजना केली जाईल.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहिलेल्या चायना पोलंड आणि बल्गेरियाच्या राजदुतांनी मराठीत मनोगत व्यक्त करीत छत्रपती शिवरायांबद्दल गौरवोद्गार काढले. छत्रपती शिवराय हे केवळ भारताचे नव्हे तर संपुर्ण जगाचे आदर्श आहेत अशा शब्दात गौरव केला या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातुन हजारोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर जमा झाले होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक