हिरकणी-नवउद्योजक योजनेचा जिल्ह्यातील बचत गटांनी लाभ घेण्याबाबत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 : महिला बचत गटांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक  ते मार्गदर्शन, तालुका व जिल्हा स्तरावर स्तरावर मंच उपलब्ध करुन देणे व उत्कृष्ट  नाविण्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा निर्माण करून अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाची  हिकणी-नवउद्योजक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. 
            राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेले व राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानातील पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट हे या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.   या व्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाचे इतर विभागाद्वारे राज्य किंवा केंद्र शासनाची इतर काही योजनेंतर्गत किमान एक वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली व पंचसूत्रीचे पालन करणाऱ्या महिला बचत गटांचा समावेश करण्याविषयी जिल्हा नाविन्यता परिषद निर्णय घेऊ शकेल.
            ही योजना प्रत्येक जिल्ह्यात चार टप्प्यात राबविण्यात येणार असून अंमलबजावणीचे टप्पे पुढीलप्रमाणे- पहिला टप्पा तालुकास्तरीय माहिती सत्र.  दुसरा टप्पा तालुकास्तरीय कल्पना सादरीकरण सत्र.  (उत्कृष्ट 10 संकल्पना प्रत्येकी रु.50 हजार/-अर्थसहाय्य)  तिसरा टप्पा जिल्हास्तरीय कल्पना सादरीकरण सत्र (उत्कृष्ट 10 संकल्पना प्रत्येकी रु.2 लाख/-अर्थसहाय्य).   चौथा टप्पा बक्षीस वितरण सोहळा.
            योजनेची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे : सदर योजनेंतर्गत महिला बचत गटांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुका स्तरावर मंच उपलब्ध करुन देण्यात येईल.  सदर  संकल्पनांना उद्योगात रुपांतरीत करण्याकरिता  तालुका स्तरावर मार्गदर्शन करण्यात येईल व त्यातील निवडक संकल्पनांची 100 च्या मर्यादेत तालुका मंचावर सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल.   सदर संकल्पनांचे तालुकास्तरीय समितीद्वारे परीक्षण करण्यात येईल.  तालुकास्तरीय समितीच्या परीक्षणाअंती निवडयोग्य ठरलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांमधून उत्कृष्ट  नाविन्यपूर्ण संकल्पनांची 10 च्या मर्यादेत निवड करण्यात येईल.  निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास रु.50 हजाराच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल.  तालुका स्तरावर निवड झालेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्हास्तरीय मंचावर सादरीकरणास पात्र ठरतील व त्यांना जिल्हास्तरावर सादरीकरणाची संधी देण्यात येईल.  जिल्हास्तरीय मंचावर जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक, व्यावसायिक,गुंतवणूकदार,बँका इत्यादींना आमंत्रित करण्यात येईल व आमंत्रिताद्वारे व जिल्हा नाविन्यता परिषदेद्वारे परीक्षण करुन उत्कृष्ट 10 नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास रु.2 लाख/- च्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल.  जिल्हास्तरीय मंचावर नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुका स्तरावर निवडलेल्या महिला बचत गटांना रु.2500/- च्या  मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येईल.  या योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वैभव निवास,भंडारआळी, चेंढरे रायगड-अलिबाग (02141222029)   येथे संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे..
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक