मुरुड तालुका विकास कामांबाबत आढावा बैठक शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा-- पालकमंत्री रविंद्र चव्हाण



अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका)- शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन अनेक लोकाभिमुख योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत  पोहचला पाहिजे असे प्रतिपादन, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड श्री. रविंद्र चव्हाण यांनी केले.  प्रकृती रिसॉर्ट काशिद येथे मुरुड तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीत ते आज बोलत होते.
            यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, मुरूड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीम.स्नेहा पाटील, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम. शारदा पोवार, तहसिलदार परिक्षित पाटील, मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर साळे, ॲङ महेश मोहिते, शशी  धारप  आदी उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, पिक विमा योजना, शेतजमीन वर्ग करण्याचा निर्णय, सरळसेवा भरती, सेवा हमी कायदा, महिलांना संरक्षण अशा अनेक नाविण्यपूर्ण योजना शासन राबवित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य निर्धारित करून काम करावे, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिल्या.  शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यासारख्या महत्वाकांक्षी योजना शासन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवत आहे.  या योजनांची सर्वसामान्य माणसाला माहिती व्हावी यासाठी अधिकाधिक प्रचार प्रसिध्दी मोहिम राबवावी.  मुरुड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातशेती करीत आहेत.  शेतकऱ्यांच्या भाताला शासनाने चांगला हमीभाव दिला असल्याने तालुक्यात भात खरेदी केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  तसेच शेती या व्‍यवसायाला चालना मिळण्यासाठी संलग्‍न असा पशुपालन, शेळीपालन, दुधाळ जनावरे यासारख्या पूरक उद्योगाची जोड दिल्यास शेतकरी आपली  प्रगती  साधू शकेल.   
यावेळी श्री.चव्हाण यांनी मुरुड तालुक्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, एसटी महामंडळ, पाणीपुरवठा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, फणसाड अभयारण्य, मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग आदि विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबतचा आढावा घेतला.
प्रस्तावित प्रवाशी जेट्टीच्या जागेची पाहणी

            बैठकीच्या प्रारंभी मुरूड तालुक्यातील काशीद येथे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रस्तावित प्रवासी जेट्टीच्या जागेची पाहणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलीजिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील असून काशीद समुद्रकिनारी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत रो रो जेट्टी तसेच इतर सुविधांसाठीच्या खर्च प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.   त्यामुळे मुरुड काशीदकडे येणाऱ्या पर्यटकांना मुंबईहून थेट काशीद समुद्र किनाऱ्यावर येण्यास मिळणार आहे.  या रो रो प्रकल्पामुळे काशीद तसेच मुरुडच्या परिसराला आर्थिक चालना मिळणार आहे. या प्रकल्पातंर्गत काशिद येथे रो-रो जेट्टी, ब्रेक वॉटर बंधारा, पार्किंग, टर्मिनल इमारत, जोडरस्ता तसेच विद्युत व पाण्याची सोय करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
रायगड हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांची पहिली पसंती ही काशीद समुद्र किनारा आहे. मुंबईवरून रस्ते तसेच मांडवा वरून अलिबागला बोटीने व तेथून रस्ते मार्गे काशीद समुद्र किनारी पर्यटक येत असतात. त्यामुळे या प्रवासात खूप वेळ जात होता.  काशीद समुद्र किनारी होणाऱ्या रो रो जेट्टी प्रकल्पामुळे पर्यटकांना मुंबई येथून जलमार्गेचा आनंद लुटत पर्यटकांना आपल्या वाहनासह काशीद समुद्र किनारी येता येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचा वेळही वाचणार आहे. सागरमाला प्रकल्पा अंतर्गत रो रो जेट्टी व इतर सुविधा होणार असल्याने काशीदच्या परिसरात पर्यटनाला चालना मिळणार आहे.  या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या रोजगारात वृद्धी होण्यास मदत मिळणार आहे.
या बैठकीला मुरुड तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक