आयुष्यमान भारत योजना : लाभार्थ्यांचे ई- कार्ड ई- सेवाकेंद्र व संलग्नित रुग्णालयात उपलब्ध



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11-  महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही योजना आता केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. त्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांना द्यावयाची ई गोल्ड कार्ड ही नजिकच्या ई- सेवा केंद्र वा संलग्नित रुग्णालयात उपलब्ध असून ती लाभार्थ्यांनी प्राप्त करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी केले आहे.
राज्यातील योजनेचे स्वरुप- राज्यात ही योजना महात्मा फुले जनआरोग्य योजना या नावाने राबविण्यात येत आहे. नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या सहभागाने ही योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेत  दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटूंबे व दारिद्र्यरेषेवरील  केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंब तसेच शेतकरी आत्महत्या ग्रस्त 14 जिल्ह्यातील  शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना विमासंरक्षणाद्वारे वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात. या योजनेअंतर्गत प्रति कुटूंब दीड लाख रुपये इतक्या विमा संरक्षण रकमेच्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार केले जातात.  तर मुत्रपिंड प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख रुपये इतकी मर्यादा आहे. 30 विशेष सेवा 971 गंभीर आजार व 121 प्रकारचे खर्चिक उपचार व शस्त्रक्रिया पश्चात सेवांचाही यात लाभ आहे.  राज्यात 484 अंगीकृत शासकीय व खाजगी  रुग्णालयांमधून रुग्णांना रोखरक्कम रहित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
केंद्र शासनाची योजना-  केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.  या योजनेत राज्यातील 83 लाख 72 हजार कुटूंबांचा समावेश आहे.  त्यात खर्च मर्यादा वाढविण्यात आली असून  लाभार्थी कुटूंबांना  प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे  वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया मोफत करता येणार आहे.  या योजनेत केंद्राचा 60 टक्के तर राज्याचा 40 टक्के हिस्सा आहे.
रायगड जिल्ह्यातील स्थिती- रायगड जिल्ह्यात 20 हजार 620 शहरी भागातील तर 1 लाख 20 हजार 489 ग्रामिण भागातील कुटूंबे या योजनेसाठी पात्र आहेत.  अशाप्रकारे रायगड जिल्ह्यातील 5 लक्ष सहा हजार 77 व्यक्तिंना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
लाभार्थ्यांसाठी ई-गोल्ड कार्ड-  या सर्व व्यक्तिंना ई- गोल्ड कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.  हे कार्ड लाभार्थ्यांना  या योजनेय समाविष्ट रुग्णालये, आपले सरकार सेवा केंद्र अशा 570 ठिकाणी उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी हे कार्ड घेण्यासाठी स्वतःचा फोटो, रेशन कार्ड, ओळखपत्र व पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे कुटूंबाला प्राप्त झालेले पत्र सोबत न्यावे.
आता पर्यंत जिल्ह्यात 7364 कार्ड वाटप झाले आहेत, परंतू लाभार्थ्यांची संख्या पाहता लवकरात लवकर कार्ड वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर मेळावे आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. तसेच सर्व कार्ड वितरण करणाऱ्या यंत्रणांनाही कार्ड लाभार्थ्यांना देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तरी सर्व लाभार्थ्यांनी जागरुकपणे आपले ई- कार्ड प्राप्त करुन घ्यावे व आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक