राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम क्षयरुग्णांची माहिती देणे बंधनकारक



अलिबाग,जि.रायगड दि.31-(जिमाका) गेल्या 50 वर्षापासून क्षयरोग नियंत्रणासाठी देशामध्ये सर्वच स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी सुध्दा दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू व अंदाजे 10 लाख क्षयरुग्ण दरवर्षी नोंद होत नसल्याचे आणि त्यापैकी बरेच क्षयरुग्ण रोगाचे निदानापासून व औषधोपचारापासून वंचित आहेत.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यामध्ये सन 2003 पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर / एक्सडीआर क्षयरोग निदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत निक्षय सॉफ्टवेअर मार्फत 69,499 इतक्या क्षयरुग्णांची नोंद राज्यातील खाजगी वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात आलेली आहे. तर शासकीय यंत्रणेमार्फत 1,40,627 इतक्या क्षयरुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. नॅशनल स्टॅटेजी प्लॅन सन 2017 ते 2025 नुसार कार्यक्रमात उपलब्ध अद्यावत सुविधा व औषधोपचार सेवा सार्वजनिक तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी  नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या 16 मार्च 2018 अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद कार्यक्रमांतर्गत होणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण केंद्रसरकार तर्फे ठरविण्यात आलेले आहे. यासाठी अधिसूचना लागू करण्यात आली असून यामध्ये क्षयरोगाचे प्रमाणक कमी करणे व त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हा या अधिसूचनेचा मुख्य उद्देश आहे.
समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून योग्य व संपूर्ण औषधोपचार करण्याची नितांत गरज आहे. राज्यामध्ये खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जवळपास निम्म्याहून जास्त क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. क्षयरुग्णांना पूर्णपणे बरे करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कार्यक्रमांतर्गत विविध सुविधा व उपक्रम राबविले जातात. उदा. निक्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांच्या नोंदणीची सोय, नि:शुल्क रोगनिदान व औषधोपचार, निक्षय पोषण योजनेंतर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत रु.500 पोषणआहारासाठी ही आर्थिक मदत रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमांतर्गत करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकास रु.500 मानधन व क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा रु.500 मानधन, क्षयरुग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहायकास ड्रग सेंसिटिव्ह क्षयरुग्णामागे रु.1000 व एमडीआर रुग्णामागे रु.5000 मानधन, रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी रु.500 मानधन इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत. क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्याने त्याचे औषधोपचार योग्य व पूर्णपणे घेणे व तो बरा होणे हा उद्देश आहे.
सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालय, वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांची नोंद करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे
क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय (https://nikshay.in/) या संकेतस्थळावर नोंद करावी म्हणजे क्षयरुग्णांना व खाजगी व्यावसायिकांना वरील सगळया सुविधांचा लाभ घेता येईल. 16 मार्च 2018 रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार क्षयरोग हा एक नोटिफायबल आजार असून त्याविषयी शासनास कळविणे बंधनकारक असल्याचे घोषित केलेले आहे. सर्व सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक यांनी त्यांच्याकडे निदान झालेले / उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असल्याने सदर क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना (जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका इत्यादी) कळविणे बंधनकारक आहे. 16 मार्च 2018 रोजीच्या क्षयरोग अधिसूचनेचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (1860 च्या 45) च्या कलम 269 आणि 270 च्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते.
औषधविक्रेत्यांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या दि. 30 ऑगस्ट 2013 च्या परिपत्रकाप्रमाणे औषधे व प्रसाधन कायदा 1945 यामध्ये सुधारणा करुन क्षयरोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे.
पुढील संस्थाकडून क्षयरुग्णांच्या नोटीफिकेशनसाठी शासकीय यंत्रणेकडे माहिती येणे अपेक्षित आहे. सर्व खाजगी दवाखाने / सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक / वैद्यकीय प्रयोगशाळा, सर्व औषध निर्माते(फार्मासिस्ट, केमिस्ट आणि ड्रगिस्ट), अशासकीय संस्थामार्फत चालविली जाणारी रुग्णालये वा दवाखाने, सर्व सार्वजनिक दवाखाने/रुग्णालये/वैद्यकीय अधिकारी.
क्षयरुग्णांना व इतर सर्वांना क्षयरोग व क्षयरोग संदर्भातील सोयी सुविधा यांची माहिती देण्यासाठी सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग्य हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी या टीबी हेल्पलाईन क्रमांकाचा 1800116666 निश्चित लाभ घ्यावा,असे जिल्हा क्षयरोग अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.सुरेश देवकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक