जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी


 अलिबाग दि.31 ऑगस्ट :-  ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे जिल्ह्यात झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची केंद्रीय पथकाने (शुक्रवार दि.30रोजी )पाहणी करुन माहिती जाणून घेतली.
           या पथकात चित्तरंजन दास, मिलींद पनपाटील, ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे आदि उपस्थित होते.
               यावेळी केंद्रीय पथकाने महाड तालुक्यातील दादली पुल, महाड बाजारपेठ, वरंध घाट, शेवते घाट येथे जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महाड बाजारपेठेत त्यांनी व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन नुकसानीबाबत जाणून घेतले.  तसेच वरंध घाट येथील पाहणी दरम्यान पारमाची येथील नागरिकांनी तेथील गावात झालेल्या नुकसानीच्या माहितीचे निवेदन दिले.  सदर निवदेना संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना केंद्रीय पथकाने उपस्थित विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.   तसेच पेण तालुक्यातील वाशी,वढाव, कान्होबा, कणे, तांबडशेत या पुरग्रस्त गावांची पाहणी करुन तेथे झालेल्या घरांची पडझड, शेततळे,गणपती कारखाना,शेती  तसेच अन्य नुकसानीची माहिती जाणून घेतली.
            जिल्ह्यातील नुकसानीची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यात सर्व तालुक्यांना पुराचा आणि अतिवृष्टीचा अधिक फटका बसला.   यामध्ये अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.  अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी नद्यांच्या धोकापातळीपेक्षा अधिक होते.  सर्व तालुक्यातील ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला.  जिल्ह्यात भातशेती अधिक असून या पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  त्याचबरोबर घरांची पडझड झाली.  या काळात जिल्हा प्रशासनाने बचाव व मदत कार्यावर भर दिला होता.  त्यांनी यावेळी झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती केंद्रीय पथकाला दिली.
या पाहणी दौरा कार्यक्रमाला  सर्व तहसिलदार, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी तसेच  विविध शासकीय  विभागांचे वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी  उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक