आपत्कालीन परिस्थितीच्या निवारणासाठी प्रशासन सज्ज नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी




अलिबाग दि.5 ऑगस्ट :-  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या निवारणासाठी प्रशासन सज्ज असून यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, वोंढागी, बोरजे व वढाव या पूरग्रस्त गावांची आज पाहणी त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ.र्धेर्यशील पाटील, उपविभागीय अधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, मेजर हिमांशू सलुजा, तहसिलदार पेण श्रीमती अरुणा जाधव  आदि उपस्थित होते.
यावेळी पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, गेल्या तीन ते चार दिवसांत पडलेल्या पाऊसामुळे अतिवृष्टी होऊन ज्या गावातील लोकांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्याची कारवाई तातडीने करावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. कणे गावातील खारबंदीस्ती मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पेण तालुक्यात पुढील काही काळात पूरपरिस्थिती उदभवल्यास सुरक्षिततेचा उपाय म्हणून पेण येथे मिलिटरीची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. पुरपरिस्थिती काळात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी पुढकार घेऊन काम केले त्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी कौतुक केले. नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित नागरीकांना केले. यावेळी त्यांनी अंतोरे, कणे, वोंढागी व वढाव येथील पूरग्रस्तांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. जिल्ह्यात उदभवलेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थितीत सापडलेल्या जवळपास 1500 नागरीकांना सुरक्षित स्थानी हलविण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे ते पाणी ओसरल्याबरोबर तातडीन त्यांचे पंचनामे करण्यात यावेत. किनारपट्टी लगत असलेल्या गावांनी सतर्क रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणे गावातील खाडीच्या दुरुस्तीसाठीची कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांनी खचून न जाता धैर्याने उभे राहिले पाहिजे.
धान्याचे नुकसान झाले असल्यास तात्काळ धान्य प्रशासनाकडून पूरविण्याचे आदेश दिले. तसेच समुद्राच्या उधाण व अतिवृष्टीमुळे खारबांधाची दुरुस्ती तात्काळ करण्याच्या आदेश खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागांना दिले. तसेच स्थलांतरित केलेल्या नागरिकांना जेवण व आवश्यकता असल्यास निवाऱ्याची सोय करण्याचे आदेश दिले. अतिदक्षतेच्या उपाय योजना म्हणून भारतीय स्थलसेनेची  अधिकारी व जवानांची 55 टिम तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी जिल्हयात आज आणि उद्या असणार आहे.
दि. 3 4 ऑगस्ट, 2019 रोजीच्या अतिवृष्टीमध्ये  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल, रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्य संस्था वाईल्डर वेस्ट ॲडव्हेंचर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अशा विविध सामाजिक संस्था/स्वयंसेवक, पोलीस विभाग, महसूल विभागाच्या मदतीने जिल्हयातील जवळपास 1000 पेक्षा अधिक पर्यटक, नागरिकांची जलद बचाव कार्य करुन सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यामुळे मोठयाप्रमाणात जिवीत हानी टाळण्यास प्रशासनास यश आले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, रायगड पाटंबधारे विभाग, विविध धरण प्रकल्पांचे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, कोंकण रेल्वे, मंत्रालय नियंत्रण कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय अशा विविध शासकीय यंत्रणांचा योग्य समन्वय व प्रतिसाद यामुळे आपत्ती काळात आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली.
यावेळी अधिकारी,कर्मचारी व अंतोरे, कणे, वोंढागी, वढाव, बोरजे गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक