अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी - पालकमंत्री रविंद्र चव्हाण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.09-  : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी आज पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टी व पूरपरिस्थिती आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी आ.प्रशांत ठाकूर, माजी आ.रविशेठ पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी महाड विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी  आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, आर्मी व सामाजिक संस्था यांना पाचारण करण्यात आले होते. सखल भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे, जमिनीचे, बांधबंधिस्तीचे तसेच घरे, गोठ्यांची पडझड  होऊन मोठे नुकसान झाले आहे. मोठी लहान दुधाळ, ओढकाम करणारी जनावरे इत्यादीचे नुकसान झाले आहे. दरडग्रस्त भागातील पडलेली झाडे तात्काळ काढून तेथील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, रस्ते पूर्ववत करणे  तसेच आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची रोगराई पसरु नये म्हणून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. शक्य तितक्या पात्र व्यक्तींना प्रशासनांने तातडीची मदत दिली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना शासन नियमानुसार योग्य ती मदत दिली जाणार असून नुकसानीबाबतचे  पंचनामे करुन आर्थिक मदतीसाठी तसा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावेत. आपत्ती प्रसंगी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, आर्मी व सामाजिक संस्था या सर्व यंत्रणांनी चांगले काम केल्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
-----------------

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक