मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन जिल्ह्यात पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित  पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील निवडणूक तयारी संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  श्रीमती वैशाली माने उपस्थित होते.        
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 24 ऑक्टोंबर 2019 रोजी मतमोजणी होईल.
जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/ खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरणे इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
            निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर खर्च सनियंत्रण समितीची नियुक्ती करण्यांत आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यांत आली आहे.
22 लाख 65 हजार 478 मतदार
जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 11 लाख 52 हजार 911  पुरुष मतदार, 11 लाख 12 हजार 563 महिला मतदार  तर 4 इतर असे एकूण 22 लाख 65 हजार 478 मतदारांची नोंदणी झाली आहे.   सन 2014 सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये 2 लाख 89 हजार 206 इतकी वाढ झाली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 955 महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन 2014 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 954 इतके होते. तर 2019 मध्ये या प्रमाणात 965 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.  दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 1201 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यांत आली आहे.  सन 2014 साली मतदारांना वाटप करण्यांत आलेल्या छायाचित्र मतदार ओळख पत्राचे प्रमाणे  94.10 टक्के  होते. तर सन 2019 मध्ये हे प्रमाणे 96.24 टक्के इतके झाले आहे.
दिव्यांग मतदारांसाठी  भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने सुलभ निवडणूका म्हणजेच Accessible Election हे घोषवाक्य जाहिर केले आहे. जिल्हयातील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 16 हजार 901 इतकी आहे.
जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट, 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यांत आला. या कार्याक्रमाची माहिती जनतेला व्हावी यासाठी व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यांत आली. सुटटयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यांत आले. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण 25 हजार 869 मतदारांची वाढ झाली आहे.
SVEEP या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यांत आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था व इतरांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यांत आला. स्विप अंतर्गत निवडणूक साक्षरता क्लब, पथनाटय, आदिवासी पाडयांवर विशेष मोहिम, महिलांसाठी तसेच 18 ते 19 वयोगटातील मतदारांचे प्रमाणे वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यांत आले आहेत.
जिल्ह्यात नियमित मतदान केंद्राची संख्या 2 हजार 693 आहे. सहाय्यकारी मतदान केंद्राची संख्या 21 आहे. असे मिळून एकूण  मतदान केंद्राची संख्या 2 हजार 714 आहे.  या मतदान केंद्रावर  पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा , प्रकाश योजना, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगासाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इ. किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्यांत येणार आहेत.
निवडणूकीसाठी कर्मचारी सज्ज
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पाडावी यासाठी सुमारे 13 हजार 900 इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   तसेच पुरेसा पोलीस कर्मचारी वृंद तैनात करण्यात येणार आहेत.
जिल्हयांमध्ये विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूकीमध्ये वापरण्यांत येणा-या EVM-VVPAT मशीनची प्रथमस्तरीय तपासणी पुर्ण करण्यांत आलेली आहे.  जिल्हयामध्ये जनजागृती कार्यक्रम सुरु झालेला आहे. आतापर्यंत 36 हजार 807 लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला असून 33 हजार 738 लोकांनी प्रत्यक्ष अभिरुप मतदान करुन पाहिलेले आहे.
यंदाच्या निवडणूकीमध्ये विविध विषयांच्या प्रभावी अंमजबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने काही IT Applications विकसित केले आहेत.  आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने cVIgil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. PwD App - दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे IT Applications उपलब्ध करुन देण्यात आले आहे.   New Suvidha-राजकीय पक्षांना प्रचार सभा, निवडणूका इत्यादी परवानगीसाठी तसेच इतर अनेक सुविधांसाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे.


1950 क्रमांकाची हेल्पलाईन
जिल्हास्तरावर (District Contact Center) स्थापन करण्यात आले आहेत.  मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध केली आहे.  ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे.
ही निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पडाव्यात या दृष्टिने चोख कायदा व सुव्यवस्था राखण्यात येणार आहे. त्यादृष्टिने राज्य पोलिस आणि CAPF यांचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अवैध पध्दतीने मद्य, रोख रक्कम वा इतर प्रलोभनांचा वापर होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. बँकांमधून होणा-या मोठया रकमांच्या व्यवहारांवर देखील लक्ष ठेवण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष निवडणूकीच्या दृष्टिने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सोयी सुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्या निवडणूकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहनही  यावेळी जिल्हानिवडणूक अधिकाऱ्यांनी केले.
000000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक