आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23 : राज्य विधानसभा निवडणूकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. काम करताना आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घ्यावी, अशा सूचना  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज आदर्श आचार संहिता अंमलबजावणीबाबत सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी बोलत होते.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख,  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव व जिल्ह्यातील विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी म्हणाले, निवडणूक कालावधीत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक आयोगाकडे वर्ग झाल्या आहेत.   त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जावे.   
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक
जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी नुकतीच (रविवार दि.22 सप्टेंबर रोजी)जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यात आचारसंहिता अंमलात आली असून आदर्श आचार संहितेचे राजकीय पक्षांनी काटेकोरपणे पालन करावे.   राजकीय सभांसाठी आवश्यक परवानग्या संबंधित यंत्रणेकडून घेतल्या जाव्यात.  यासाठी निवडणूक आयोगाने विविध ॲप्लीकेशन विकसित केले आहेत.  त्याचबरोबर वेबसाईटवरुनही परवानगी मिळू शकते.  प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी केली जावी.  इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मिडियावरुन राजकीय जाहिरात करण्यापूर्वी ती जाहिरात पूर्वप्रमाणीकरण करुन घेतली पाहिजे.  त्यासाठी संबंधित समितीकडून जाहिरात पूर्वप्रमाणीकरण करुन घ्यावी.   माहिती पुस्तिका, हॅन्डबिले मुद्रण करताना त्यावर प्रकाशक आणि  संख्या याची माहिती प्रकाशित करण्यात यावी असे जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी सांगितले. 
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक