अलिबाग विधानसभा मतदार संघाची प्रशासकीय तयारी पूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम.शारदा पोवार




अलिबाग (जिमाका) दि.26 : विधानसभा निवडणूक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे. मतदारसंघात एकुण 371 मतदान केंद्र असल्याची माहिती अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम.शारदा पोवार यांनी  आज पत्रकार परिषदेत दिली.
श्रीम.पोवार म्हणाल्या, अलिबाग मध्ये चार मतदान केंद्राचे विभाजन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात अलिबाग तालुक्यातील 1 तर रोहा तालुक्यातील 3 मतदान केंद्रांचा समावेश आहे.   सारसोली केंद्राचे विभाजन करून टिटवी हे नवीन केंद्र सुरु केले जाणार आहे. सुडकोली केंद्राचे विभाजन करून म्हसाडी केंद्र सुरु केले जाणार आहे. गायचोळ मतदार केंद्राचे विभाजन कडून खांबेरे मतदान केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तर अलिबाग तालुक्यातील रुईशेत केंद्राचे विभाजन करून भोमोली हे स्वतंत्र केंद्र सुरु केले जाणार आहे. प्रस्तावास निवडणूक आयोगाने मान्यता दिली तर चारही केंद्रावर यंदा मतदान प्रक्रीया पडेल.
महिला मतदारांचे प्रमाण अधिक
    अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ९३ हजार ९६२ मतदार आहेत. यात अलिबाग तालुक्यातील २ लाख ०६ हजार ९०७, मुरुड तालुक्यातील ६३ हजार ४६७ तर रोहा तालुक्यातील २३ हजार ५८८ मतदारांचा समावेश आहे. मतदार संघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. मतदारसंघात १ लाख ४५ हजार ९१९ पुरुष तर १ लाख ४८ हजार ०४३ महिला मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत , शांततेत पार पडावी यासाठी पोलीसांसह २ हजार ५३४ कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे . यात ४२ क्षेत्रीय अधिकारी असतील .
        अलिबागचे तहसिलदार सचिन शेजाळ, मुरूडचे तहसिलदार गमन गावीत व मुरूड नगर पालिकेचे मुख्‍याधिकारी अमित पंडित हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून काम पाहणार आहेत, वरसोली येथे आदर्श मतदान केंद्र, चेंढरे येथे दिव्यांग मतदान केंद्र, तर वेश्वी आरसीएफ कॉलनी येथे २ सखी केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.
            नुकतीच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली.  उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरताना फक्त चार व्यक्तीं आणि तीन वाहनांना परवानगी दिली जाणार आहे. मतदार संघामध्ये आदर्श आचारसंहिता अमंलबजावणी करिता ५ आचारसंहिता पथके,५ भरारी पथके,४ स्थिरसर्वेक्षण पथके,५ व्हिडिओ सर्वेक्षण पथके नेमणूक करण्यात येऊन यांचे काम प्रभावीपणे सुरु असल्याची माहिती श्रीम.पोवार यांनी दिली.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक