विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी जिल्हास्तरीय व मतदार संघ निहाय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना




रायगड अलिबाग दि.04 :  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी MCMC) स्थापना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे.  तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
    जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी,  पत्रकार जयंत धुळप, अपर जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी श्री.निलेश लांडगे हे समिती सदस्य असून प्र.जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय सु. कोकरे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
          निवडणूक  कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या टी.व्ही.चॅनेल, रेडीओ एफ एम, केबल्स व वृत्तपत्रातील निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे,  बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून त्याबाबत योग्य कारवाई करणे आदी कामे ही समितीमार्फत केली जाणार आहेत.  माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे टीव्ही चॅनेल,  रेडीओ एफएम,  प्रचाररथ, सिनेमागृह, सोशल मिडीया तसेच वृत्तपत्रांच्या इ-आवृत्तीतील (जाहिराती)  सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्या दृक-श्राव्य (ऑडिओ –व्हीज्यूअल) जाहिरातींसाठी  प्रसारणपूर्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (इंग्रजी किंवा  मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्ये आवश्यक माहिती भरुन सादर केला जावा. अर्जासोबत दोन सीडी ( सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्या टंकलिखीत मजकुरासह दोन प्रती-ट्रान्सस्क्रीप्ट) जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण समिती स्थापन करण्यात आलेली असून सदरील समितीशी संपर्क साधावा.
       निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण समितीकडे उमेदवारांच्या  जाहिरातीचे प्रमाणीकरण करून दिले जाणार आहे.  रायगड जिल्ह्यातील विधानसभेचे  उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी(प्राधिकृत असलेले) सदरील समितीकडे अर्ज सादर करु शकतात. त्याप्रमाणेच फक्त उमेदवाराच्या वैयक्तिक सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरील पोस्ट, फोटो,  व्हिडीओ यांच्यासाठी प्रमाणपत्राची  गरज नाही.
       प्रत्येक  ऑडिओ  जाहिरात किंवा ऑडिओ-व्हीज्यूअल जाहिरात ही  स्वतंत्र असावी.  एकाच सीडीमध्ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नये. अर्जदाराचे पूर्ण नाव,  पत्ता,  जाहिरात कोणत्या उमेदवारासाठी आहे  त्याचे नाव,  पक्षाचे नाव,  जाहिरात कुठे दाखवणार,  जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च,  जाहिरातीतील भाषा याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे.
      मान्यताप्राप्त राजकीय  पक्षाचे उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी 3  दिवस  आणि  इतर उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी 7  दिवस आगोदर अर्ज करु शकतात. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्य असावा. इतरांची  बदनामी  करणारा, जाती-जातींमध्ये,  धार्मिक  तेढ निर्माण  करणारा नसावा. देशविघातक कृत्याला  प्रोत्साहन देणारा  नसावा.
 0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक