जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी कल्पक उपक्रम राबवावेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी-डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आवाहन




 रायगड-अलिबाग दि.03:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी रायगड जिल्ह्यात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी स्वीप (SVEEP) कोअर समितीमधील सर्व अधिकारी व त्यांच्या सदस्यांनी सर्व स्तरावर गतीमानतेने व सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी  यांनी केले.
मतदान जागृती कार्यक्रमाची (SVEEP) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी  व जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय अधिकारी व अशासकीय संस्थाचे (NGO) पदाधिकारी यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय स्वीप कोअर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची आज जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या समिती सभागृहात बैठक झाली.   त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते.
            डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील अगदी तळागाळाच्या मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी व मतदानाच्या टक्केवारीमध्ये संख्यात्मक वाढ होणेसाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत, एस.टी.बसचे मार्ग, विविध मॉल्स, सिनेमागृहे, बँका  येथे विविध प्रसिध्दी साहित्याच्या (पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज इ.) माध्यमातून तसेच जिंगल्स, ऑडिओ व व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदान विषयक जनजागृती करण्यात येत आहे.  तसेच महिला बचत गटांमध्ये स्पर्धा घेऊन मतदान वाढीसाठी प्रयत्न करावा.  चुनाव पाठशाळा सारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. 

विशेषत: नवमतदार वर्गासाठी विविध महाविद्यालये, सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, विविध शासकीय कार्यालये इ. ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  शाळा/महाविद्यालये व शासकीय/निमशासकीय, कार्पोरेट संस्था येथे मतदान करण्यासाठीचे सामुहिक शपथग्रहण, स्वाक्षरी अभियान,संकल्प पत्र भरुन घेणे, पथनाट्य सादरीकरण, रॅलीज काढणे, विविध प्रासंगिक उत्सवातून मतदानविषयक जनप्रबोधन, अन्य सांस्कृतिक व नावीन्यपूर्ण उपक्रम याचे नियोजन करण्यात येत आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविका, विविध स्वयंसेवी संस्थाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून जिल्ह्यातील घरांघरांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मधील मतदानाची टक्केवारी नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या तुलनेत अधिक असावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, स्वीप समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई, अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, कामगार  उप आयुक्त प्रदिप पवार तसेच स्वीप समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक