प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांसाठी लाभदायी --निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे


अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका)- जिल्ह्यातील विविध उद्योग व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांच्या वृध्दापकाळासाठी व सामाजिक सुरक्षेसाठी शासनाची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन महत्वाकांक्षी योजना लाभदायक असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांनी आज येथे दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात कामगार आयुक्त कार्यालय, पनवेल यांनी असंघटीत कामगारांकरिता प्रधानमंत्री श्रमयोगी योजना व लघु व्यापाऱ्याकरिता राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह साजरा करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
            यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.पद्मश्री बैनाडे पुढे म्हणाल्या की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे, लघु व्यापाऱ्यांकरिता त्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी किंवा त्यापेक्षा कमी असावी,ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी,कर्मचारी राज्य विमा निगम,भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजना व प्रधानमंत्री मानधन योजनेचा सभासद नसावा.   तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बॅंकेचे पास बुक,इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असून नियमितपणे या योजनेचे अंशदान अदा केल्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तीस दरमहा रु.3000/- प्रमाणे मानधन मिळणार आहे.  सदर लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरु ठेवता येणार आहे.  या योजनेची नोंदणी नागरी सुविधा केंद्रामार्फत केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये असंघटीत क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी नागरी सुविधा केंद्रामार्फत  करावी. त्याकरिता अर्जदारास अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसेच आवश्यकता भासल्यास सुविधा केंद्र उपलब्ध करुन दिले जाईल.   या योजनेंतर्गत जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कार्यरत सर्व कामगारांची, लघु व्यापाऱ्यांची नोंदणी प्राधान्याने करुन जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करुन राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी या योजनेसाठी नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना डॉ.पद्मश्री बैनाडे यांचेहस्ते कार्डचे वाटप करण्यात आले.
            यावेळी कामगार आयुक्त पनवेल प्र.ना.पवार,संभाजी व्हनाळकर, बी.एम.आंधळे,भारतीयआयुर्विमा महामंडळाचे प्रतिनिधी, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी, एनआयसीचे प्रतिनिधी,जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाचे प्रतिनिधी तसेच असंघटीत क्षेत्रातील विविध संघटना प्रतिनिधी, बचतगट, बांधकाम कामगार,विटभट्टी कामगार, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर त्याचबरोबर रिक्षा चालक प्रतिनिधी, फेरीवाले आदि  उपस्थित होते.
 000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक