जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यासाठी 247 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर विकास कामांच्या योजना निधीला प्राधान्य -ना.श्रीमती तटकरे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- जिल्हा नियोजन समितीने सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी (सर्वसाधारण) 189.64 कोटी, टी.एस.पी. 32.98 कोटी, एस.सी.पी. 24.94 कोटी अशा एकूण 247 कोटी 56 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास आज मान्यता देण्यात आली.  विकास आराखड्याचे नियोजन करतांना जिल्ह्यात राबवावयाच्या विकास कामांसाठी राज्य व केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती  राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी उपस्थित सदस्यांना दिली.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीस  पालकमंत्री ना. श्रीमती आदिती तटकरे या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी,  खासदार श्रीरंग बारणे, खा.सुनिल तटकरे,  आमदार सर्वश्री आ. भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, आ.रविशेठ पाटील, कोकण विभागीय अधिकारी शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
 यावेळी पालकमंत्री ना.श्रीमती तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण व विकास कामांचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पुढील वर्षी महत्वपूर्ण योजना म्हणून जिल्ह्यातील सर्व स्मशानभूमी बांधकामासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.   तसेच विविध योजनेसाठी वाढीव मागणी 45 कोटी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरीय सभेत मा.वित्तमंत्री महोदयांकडे मागणी करण्यात येणार आहे.   नाविन्यपूर्ण योजनांतर्गत पुढीलवर्षी रुग्णांसाठी स्पीडबोट तयार करण्याची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थीनींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेतील उपस्थिती वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुलींना सायकल पुरविणे हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून यामध्ये शाळा ते घर हे अंतर 5 कि.मी. पेक्षा जास्त असल्यास अशा मुलींना प्राधान्याने सायकल देण्यात येणार आहे.   नागरी सुविधा अंतर्गत 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.   यामध्ये 20 कि.मी. परिसरातील गावांचाही कचरा उचलून निचरा करण्याची योजना आहे.   तालुका स्तरीय क्रीडा संकुल अद्ययावत करण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे.  अंगणवाडी दुरुस्तीसाठी शासन निर्णयानुसार 1 लक्ष मर्यादा आहे. सदर मर्यादा वाढविण्यासाठी शासन स्तरावर शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  कोकण विभागात मंजूर निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा आघाडीवर आहे. त्यादृष्टिने फेब्रुवारी महिनाअखेर  निधी 100 टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही यंत्रणा प्रमुखांना देण्यात आले.   बैठकीच्या प्रारंभी अभिनंदन ठराव व दु:खवट्याच्या मंजूर ठरावाचे वाचन करुन श्रदांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, आ. भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, आ.रविशेठ पाटील,आदींनी सहभाग घेतला.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक