महिला व बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे --जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट विरार मिलिंद पोंगशे

महिला व बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे
                                           ---जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट विरार मिलिंद पोंगशे

अलिबाग, जि. रायगड, दि.03 (जिमाका)-   महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक करताना अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन जाणीव चॅरिटेबल स्ट्रस्ट विरारचे मिलिंद पोंगशे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून उन्नत सप्ताहा निमित्ताने जे.एस.एम.कॉलेज अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी जे.एस.एम.कॉलेज येथील लॉ कॉलेजच्या प्राचार्य ॲङरेश्मा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कदम, श्रीमती स्वाती पवार,पोलीस निरीक्षक श्री.कोल्हे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.साखरकर आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.पोंगशे म्हणाले की, आपल्या समाजात पुरोगामी बदल घडून आले तरी दुर्देवाने स्त्री म्हणजे उपभोग वस्तू या दृष्टीने पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.  त्यामुळे सार्वजनिक ठिकाणाहून जाणाऱ्या मुलींची छेडछाड,पाठलाग करणे, वाईट नजरेने बघणे अशा अनेक घृणास्पद घटना वारंवार उजेडात येत असल्याने शालेय विद्यार्थीनींमध्ये असुरक्षिततेचे भयचक्र भेदण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने जिल्ह्यात सायबर सेफ वुमन ही मोहीम राबविण्यात येत आहे.    डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सायबर गुन्हे होत आहेत. यामध्ये विशेषतः महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आदी गुन्हे होत आहेत. सायबर गुन्ह्यांची तसेच अशा गुन्ह्यासंदर्भातील कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.  विद्यार्थीनींनी चांगले व वाईट कसे ओळखावे,मुलींनी कसे वागावे,समाजात सुरक्षित कसे रहावे,विचार,संस्कार,भय,स्पर्श,प्रलोभन,आकर्षण, वर्तणूक, व्यसन या विषयांवर मुलींचे आत्मभान जागृत करुन त्यांना स्वत:ची ओळख करुन देण्यासाठी तसेच  बदलत्या काळात गुन्हेगारी विश्वही नवनवीन माध्यमांचा वापर करत आहे. डिजिटल युगात गुन्हेगार इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे करत आहेत. त्यातून महिला व बालकांचे लैंगिक शोषण व फसवणूक करत आहेत. अशा घटनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही मोहिम महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचे जसे अनेक फायदे आहेत, त्याचबरोबर काही वाईट गोष्टीही त्या माध्यमातून समाजात पसरत आहेत. सायबर गुन्ह्यांचे वाढणारे प्रमाण चिंताजनक असून त्याहीपेक्षा या गुन्ह्यांचे वारंवार बदलणारे स्वरूप जास्त गंभीर आहे. गेल्या काही काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाने अशा गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
या कार्यक्रमाला पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच जे.एस.एम.कॉलेज, जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय, जा.र.कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक