शेतकरी सन्मान व मार्गदर्शन केंद्रांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-कृषिमंत्री ना.दादाजी भुसे


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी, समस्याचे निवारण करणे,योग्य सल्ला देणे व तोही आदर आणि सन्मानपूर्वक यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्षाची सुरुवात करण्यात आली असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन  राज्याचे कृषि,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज येथे केले.   जिल्हा नियोजन भवन, अलिबाग येथील सभागृहात आयोजित शेतकऱ्यांना संबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी आमदार महेंद्र दळवी, जि.प.सदस्य सुरेंद्र म्हात्रे, राजा केणी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, तहसिलदार सचिन शेजाळ, वि.कृ.स.सं. ठाणे श्री. प्रमोद लहाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, कृषि उपसंचालक सतिश बोराडे, कृषि विकास अधिकारी श्री. लक्ष्मण खुरकुटे आदि उपस्थित होते. 
            यावेळी मार्गदर्शन करताना कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले की,  शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.   त्याच्या जीवनशैलीतून समाजाला अन्नधान्य व उपजिविका पुरवली जाते.  शेती ही त्याची जीवन पध्दती असून त्याने त्याकडे कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही.  फायदा,नुकसान काहीही झाले  तरी तो तेवढ्याच उमेदीने पुढच्या वर्षी पुन्हा कामाला लागतो. याच पाश्वभूमीवर सद्य:स्थितीत त्यावर ओढणाऱ्या समस्यांचे ओझे सुसह्य करणे आणि त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी  ही योजना जाहिर केली आहे.  शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी कर्ज माफी योजना राबविली असून या योजनेतून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली असून त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  2 लाखावरील ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत त्यांचीही कर्जमाफी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.  शेतकऱ्यांच्या शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्याकरिता शासनाच्या विविध यंत्रणांकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधून त्यांचे सनियंत्रण करण्यासाठी तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.  कक्षास भेट देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नोंद ठेवण्यात याव्यात.  त्यात त्यांच्या समस्या, अडचणी व त्यावर केलेले मार्गदर्शन याचा समावेश असावा.  राज्यात आज जवळपास 500 पेक्षा अधिक कार्यालयात या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात उत्पादन कसे घेता येईल,त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वाहन व्यवस्था, मालाला योग्य तो भाव मिळणे व त्याची साठवणूक करुन ठेवण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या देण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न करण्यात येईल.  कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, वेश्वी अलिबाग येथे स्थापन करण्यात आलेल्या  शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून उद्घाटन करण्यात आले.
            याप्रसंगी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला ते पुढीलप्रमाणे.  उत्तम पाटील,कुसुंबळे ता.अलिबाग. मकरंद अरविंद आठवले नागाव,ता.अलिबाग.  सतिश कृष्णा म्हात्रे, कार्ले, ता.अलिबाग. प्रकाश कृष्णा पाटील, सातघर, ता.अलिबाग. महादू बाळू सुतक, आधरणे, ता.पेण.  बळीराम बाळू पाटील, गागोदे ता.पेण.  अनंत चिंधु डिंगळे, वाक्रुळ ता.पेण.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके यांनी केले.  कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक