कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकास कामांना प्राधान्य दिले जाईल ---पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे



अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- ग्रामीण भागाचा विकास व्हावा, तेथील लोकांना लोकहिताच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासन विकासाच्या महत्वपूर्ण योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकास कामांना प्राधान्य दिले जाईल असे, प्रतिपादन  राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी आज येथे केले.   कुहिरे येथील विविध विकास कामांच्या भूमिपुजन  प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 
यावेळी कुहिरे ग्रामपंचयातीच्या सरपंच श्रीमती प्रज्ञा जवके, उपसरपंच मनोहर पारधी, तहसिलदार पेण श्रीमती अरुणा जावध तसेच कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी वाडीतील आणि कुहिरे गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, कुहिरे गावातील काही प्रलंबित कामे असतील किंवा नव्याने कामे करायची असतील तर त्या विकास कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.   तसेच कुहिरे ग्रामपंचायत हद्दीत विकासकामे करत असताना येथील आदिवासीवाडीतील विकास कामांना प्राधान्य देण्यात येऊन आदिवासी बांधवांचे काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते सोडविले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.  रायगड किल्ल्यावर असलेल्या मेघडंबरीप्रमाणेच या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात आले आहे याचा मनस्वी आनंद होत असून या  बांधण्यात आलेल्या स्मारका समोरील भागात सुशोभिकरणाकरिता जिल्हा नियोजन मधून निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.  या गावातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.  सभामंडपाची काही कामे प्रलंबित असतील तर ती कामेही पूर्ण करण्यात येतील. गावच्या विकास कामांसाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. या विभागात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांना क्रीडा विभागाच्या माध्यमातून पाठबल दिले जाईल.  तसेच कुहिरे ग्रामसचिवालयाच्या  विस्तारीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.  कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्रीमती तटकरे यांच्याहस्ते कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडीतील विकास कामांचे भूमिपुजनही करण्यात आले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक