छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे असे उदगार महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
मा.राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री ना.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रायगड किल्ल्यावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने विविध विकास कामे सुरु आहेत. त्यांची प्रत्यक्ष पाहणी मा.राज्यपाल महोदयांनी केली. रायगड किल्ल्यावर असलेल्या विविध भागात स्वत: जावून पाहणी केली. तत्पूर्वी मा.राज्यपाल महोदयांनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. रायगडावर आलेल्या पर्यटकांना त्यांनी हात उंचावून अभिवादन केले आणि चिमुकल्यांशी संवादही साधला. रायगडावर असणाऱ्या पुरातत्व विभागाच्या छोट्या वास्तू संग्राहलयास भेट देऊन पुरातत्व वस्तूची माहिती समजून घेतली.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक