“करोना विषाणू..कोविड-19” काळजी करू नका.. काळजी घ्या ! समजून घेऊ.. काय आहे शिवभोजन योजना..




करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.   
             कोविड-19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे.  या कालावधीत राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील.
दरम्यान शासन निर्णय क्रमांक शाभोथा-2019/ प्र. क्र. 51/ नापु-17 दि. 1 जानेवारी 2020 नुसार गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.   या शासन निर्णयानुसार दि.26 जानेवारी 2020 पासून गरीब व गरजू व्यक्तींना या शिवभोजन भोजनालयातून सुरळीत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
 आता दि. 26 मार्च 2020 च्या शासन परिपत्रकानुसार दि.01 एप्रिल 2020 पासून या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यास देण्यात आलेल्या इष्टांकात  पाचपट वाढ करण्यात आली आहे.  शिवभोजन उपलब्ध करून देणारी भोजनालये दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध व्हावे, यासाठी सुरू राहणार आहेत.   या भोजनालयातून फक्त आणि फक्त शिवभोजनच उपलब्ध करून देण्यात येईल,याची कटाक्षाने पाहणी करण्याची जबाबदारी शासनाने संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यावर सोपविली आहे.   
शासन निर्णय दि. 1 जानेवारी 2020 नुसार ही योजना राबविण्यासाठी सक्षम खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांची निवड करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचे निर्देशित करण्यात आले आहे.  तालुकास्तर-तहसिलदार, अध्यक्ष, गटविकास अधिकारी-सदस्य, नगरपालिका/ नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी-सदस्य सचिव.   या समितीने शासन निर्णय दि.01 जानेवारी 2020 मधील तरतुदींचे अवलोकन करून तालुकास्तरावरील शिवभोजन केंद्रांची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   याबाबतचा कार्यारंभ आदेश संबंधित शिवभोजन केंद्रांना देण्यात यावा.   ही केंद्रे दि.01 एप्रिल 2020 पासून कार्यान्वित होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.   निवड केलेल्या शिवभोजन केंद्रचालकांना शासन परिपत्रक दि. 06 जानेवारी 2020 नुसार स्वच्छता, शिवभोजन ॲपचा वापर याबाबतचे प्रशिक्षण आवश्यक केले आहे.
या योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रति थाळी रु.50/- व ग्रामीण भागात रु.35/- इतकी असणार आहे.   समितीने पात्र ठरविलेल्या शिवभोजन केंद्र यांना प्रति ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या रु. 10/- व्यतिरिक्त उर्वरित शहरी भागासाठी रुपये 40/- व ग्रामीण भागासाठी रुपये 25/- एवढे अनुदान म्हणून शासनाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे व त्यांच्यामार्फत ते संबंधितांना वितरित करण्यात येईल, असे निर्देश शासन निर्णय दि.23 जानेवारी 2020 मध्ये देण्यात आले आहेत.   
शासन निर्णय दि. 1 जानेवारी 2020 नुसार या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी रुपये 10/- प्रति थाळी याप्रमाणे हे भोजन उपलब्ध करून देण्यात येते.   
शिवभोजन भोजनालय चालकाने शिवभोजन उपलब्ध करून देताना कोणती खबरदारी घ्यावी, याचेही स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत,ते पुढीलप्रमाणे-
·         भोजनालय दररोज फक्त दुपारी 12 ते 3 या वेळेत शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू राहील.
·         शिवभोजनालयातून व्यावसायिक कारणासाठी जेवण उपलब्ध करून दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
·          शिवभोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टित स्वरूपात भोजन ( Pack food)पार्सल उपलब्ध करून द्यावे.
·         शिवभोजन तयार करणाऱ्या व्यक्तींनी शिवभोजन तयार करण्याआधी त्यांचे हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
·         शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतूक करून घ्यावीत.
·         शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत.
·         शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा.
·         शिवभोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट म्हणजे एक मीटर अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
·         केवळ शिवभोजन ॲप मध्ये नोंद करूनच या लाभार्थ्यांना थाळीचे वितरण करावे.
 आता पाहूया रायगड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंजूर थाळ्यांची संख्या-
पेण- 100, मुरुड-100, उरण-100, रोहा- 100, सुधागड- 75, कर्जत- 100, खालापूर- 100, महाड- 100, माणगाव- 100, पोलादपूर- 75, म्हसळा-75, श्रीवर्धन- 100, तळा- 75 असे एकूण 1 हजार 200
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून रायगड जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू होऊन लॉकडाऊन केले आहे.  मात्र कोणत्याही नागरिकांची उपासमार होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही  नागरिकाची उपासमार होणार नाही, याची जिल्हा प्रशासन सर्व तऱ्हेने काळजी घेत आहे. 
आता नागरिकांनीही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे,स्वच्छता बाळगणे,सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या गोष्टींचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे....आपल्यासाठी...आपल्या कुटुंबियांसाठी...आपल्या समाजासाठी...आपल्या देशासाठी !

(मनोज शिवाजी सानप)
 जिल्हा माहिती अधिकारी,
  जिल्हा माहिती कार्यालय,
रायगड-अलिबाग
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक