रविवार 22 मार्चचा जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा. घराबाहेर पडू नका, प्रशासनास सहकार्य करा - पालकमंत्री आदिती तटकरे




अलिबाग दि.21, कोरोना च्या पार्श्वभूमीवर कुणीही घाबरू नये सर्वांनी धीर धरावा. कुठल्याही प्रकारचं संकट ज्यावेळेस राज्यावर आणि देशावर येतं, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीनं त्या संकटाचा सामना केला पाहिजे, ही आपली सगळ्यांची  सामुदायिक जबाबदारी आहे. या स्थितीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. 
कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत आपण दुसऱ्या टप्प्यात असून त्यापुढील टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत.
रविवार दि 22 मार्च 2020 चा सकाळी 7 ते रात्री 9 पर्यत सर्वांनी घरीच थांबून जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा. घराबाहेर पडू नका.
31 मार्च पर्यंत घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळा. आपल्या परिवाराची काळजी घ्या, तोंडाला मास्क वापरा, खोकताना व  शिंकतांना तोंडाला रुमाल लावा, हात वारंवार स्वच्छ धुवा.
कोरोना विरुद्धातील लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन आपल्या सर्व शक्तीनिशी सज्ज आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभाग, प्रशासन सर्व अधिकारी यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. गेल्या 15 दिवसांपासून आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी, राज्यावर आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत.
संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढवलेलं आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणं हा महत्त्वाचा उपाय आहे, आपल्या निवडक नातलगांच्या उपस्थितीत शुभविवाह समारंभ पार पाडा व पुढील कार्यक्रम काही कालावधीसाठी पुढे ढकला. याशिवाय मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दशक्रियाविधी सुद्धा आटोपा. शक्य तेवढी गर्दी टाळण्याचा प्रयत्न सर्वांनी करा, स्वतःसोबत इतरांचंही आरोग्य जपा, 
 आरोग्य विभाग व प्रशासन यांनी  केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. घरगुती, कार्यालयीन कामकाज  घरी थांबूनच पूर्ण करा.
सर्व अधिकारी व प्रशासन अतिशय जागरुकपणे सर्व परिस्थिती हाताळत आहेत. आपण सर्वांनी दक्ष राहून त्यांना सहकार्य करुया व कोरोनाला हद्दपार करूया यात आपल्या सर्वांच्या सहकार्याची व दक्षतेची आवश्यकता आहे असे आवाहन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी  केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक