जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू राहतील नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी ----जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी



अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) :  करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि.14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू झाले असून उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, नागरिकांसाठी विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत.
             त्यानुसार जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी गटविकास अधिकारी यांना गावनिहाय व मुख्याधिकाऱ्यांनी  वॉर्डनिहाय, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, जे वयोवृद्ध नागरिक आहेत, ज्यांना कोणाचाही आधार नाही व दिव्यांग अशा लोकांसाठी त्यांना लागणारे जीवनाश्यक साहित्य पुरवावे.  याशिवाय भाजी विक्रेत्यांना मंडईच्या जागा नेमून द्याव्यात, जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे, त्यांनी आपली दुकाने 24 तास चालू ठेवावीत. जिल्ह्यात शासकीय व खाजगी बायोमेट्रिक अटेंडन्स बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.  
            बॅंकिंग व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्व बँक मॅनेजर मुख्यालय स्थळी थांबतील, असे आदेश देण्यात आले असून सर्व एटीएम व्यवस्थितपणे सुरू राहतील व लोकांना पैसे मिळतील यासाठी बँक कर्मचाऱ्यांनाही तसे आदेश देण्यात आले आहेत. एसबीआयच्या जिल्हा प्रमुखांना तसेच महाडच्या एसबीआय मॅनेजर यांना ते गैरहजर असल्यामुळे व एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे  जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 
            येत्या एक ते दोन दिवसात जीवनावश्यक वस्तूंचा सुरळितपणे पुरवठा सुरू होईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जनतेला केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक