शासन आणि प्रशासन सर्व तऱ्हेने जनतेच्या मदतीकरिता प्रयत्नशील मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे---पालकमंत्री आदिती तटकरे



अलिबाग, जि. रायगड, दि.27 (जिमाका) : करोना विषाणूंचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन सर्व पातळ्यांवर रात्रंदिवस प्रयत्नशील आहे.   संपूर्ण देश करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी काळजी घेत आहे.   मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.  
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन राबवीत असलेल्या  उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी रोहा प्रांताधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याशी संवाद साधला.   त्यावेळी त्या बोलत होत्या.
 यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सर्व प्रशासनाला सूचना देताना सांगितले की, जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडून ज्या सूचना दिल्या गेल्या आहेत, जे आदेश पारित केले जात आहेत, त्यांचे तंतोतंत पालन करावे.   जनतेमध्ये विश्वास निर्माण करायला हवा की, शासन व प्रशासन त्यांच्या मदतीसाठी सदैव सज्ज आहेत, तत्पर आहेत.   प्रशासनाने अधिक लक्ष देऊन लोकांची गर्दी कमी होण्यासाठी प्रयत्न करीत राहावे.   मुंबई-पुणे किंवा बाहेरगावाहून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना होम क्वॉरनटाईन करावे, याची नोंद ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी.  खाजगी दवाखाने सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी.   मात्र ज्या डॉक्टरांच्या घरातील सदस्य परदेशातून आले असतील वा ते होम क्वॉरनटाईन असतील तर त्या डॉक्टरांनी स्वतःही क्लिनिकला जाऊ नये व स्वतःलाही होम क्वॉरनटाईन करून घ्यावे. 
 याशिवाय पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी एक बाब निदर्शनास आणून दिली की, नागरिकांकडून ॲम्ब्युलन्सचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, तो होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.   
जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी आधीच बंद करण्यात आली आहेत, मात्र स्थानिकांनीही घराबाहेर पडू नये.   दि.1 मार्चपासून जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व व्यक्तींची पुन:श्च वैद्यकीय तपासणी करण्यात यावी तसेच त्यांनी केलेल्या प्रवासासंबंधीची सविस्तर माहिती घ्यावी  असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, हेल्पलाईन क्र.108 व 104 या आरोग्य व्यवस्थेला सहकार्य म्हणून समांतर ॲम्ब्युलन्स व्यवस्था सुरू करण्याबाबतचे नियोजन करावे.   पोलादपूर, महाड भागातील साठवण टाक्यांमधील पाण्याची गुणवत्ता तपासून त्या पाण्याचा नागरिकांकडून नियमित वापर व्हावा, यासाठी योग्य ते नियोजन करावे.   भविष्यातील पाणी टंचाईचे नियोजन आत्ताच करून त्याबाबतचा प्रस्ताव ई-मेलद्वारे प्रशासनाला सादर करावेत.   टँकरचे नियोजन करावे.   बाहेरून आलेल्या व्यक्तींची नियमित वैद्यकीय तपासणी करावी.   जागेची कमतरता असल्यास त्यांची व्यवस्था समाजमंदिरात किंवा व्यायाम शाळांमध्ये करावी.   खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शक्य तितकी वैद्यकीय संसाधने उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत.   मुख्य म्हणजे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर आणि मास्क पुरवावेत.   पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकाच हप्त्यात सात हजार रुपये देण्याचे नियोजन करावे, त्यासाठी बँकांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात याव्यात. दारिद्रयरेषेखालील (बीपीएलधारक) नागरिकांना पुढील तीन महिने धान्य वाटप करावयाचे आहे, त्याचेही नियोजन तयार ठेवावे.   गावागावात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवावी.
शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते जबाबदारीने करीत असलेल्या  कामाबद्दल शाबासकी देऊन त्यांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा पालकत्वाचा सल्लाही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिला. 
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक