जिल्ह्यात 1 मार्च पासून 58 शिवभोजन केंद्रांमधून तब्बल 1 लाख 18 हजार 267 शिवभोजन थाळ्यांचे झाले वितरण गरजू लोकांच्या पोटाला दिला शिवभोजन थाळ्यांनी आधार




अलिबाग,दि.24 (जिमाका)- राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त शिवभोजन केंद्रातून शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्यात येत आहे. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात तसेच राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे परराज्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील अनेक कामगार, मजूर हे रायगड जिल्हयातील पनवेल, खोपोली, खालापूर, उरण, कर्जत, पेण, अलिबाग इत्यादी भागात अडकून पडलेले आहेत.
रोजगाराअभावी या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्रावरुन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यात 1 मार्च पासून एकूण 58 शिवभोजन केंद्रांवरुन तब्बल 1 लाख 18 हजार 267  शिवभोजन थाळ्यांचे वितरण झाले आहे.
            जिल्ह्यातील मंजूर शिवभोजन थाळ्यांची संख्या एकूण 11 हजार 150 आहे.  दि.1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या कालावधीत जिल्ह्यात 7 हजार 131 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले.  त्यानंतर दि.1 एप्रिल  2020 ते 24 एप्रिल 2020 या कालावधीत एकूण 1 लाख 11 हजार 136 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात 11 हजार 150 मंजूर थाळ्या असल्या तरी लॉकडाऊनच्या या कठीण परस्थितीत जिल्ह्यातील गरजू व्यक्तींची निकड पाहता आतापर्यंत एकूण   1 लाख 18 हजार 267 शिवभोजन थाळ्यांचे वाटप झाले आहे. शासनाने ज्या हेतूने शिवभोजन योजना सुरु केली होती, तो हेतू 100 टक्के सफल झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे आणि नागरिकांमधूनही याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
  करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व कार्यरत शिवभोजन केंद्रांना ही योजना राबविताना ही भोजनालये दररोज फक्त दुपारी 11-00 ते 3-00 या वेळेत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु राहतील, भोजनालयातून व्यावसायिक कारणासाठी जेवण उपलब्ध करुन  देण्यात येऊ नये, शिवभोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टित स्वरुपात भोजन (Pack Food) पार्सल उपलब्ध करुन दयावे,शासनाने पुरविलेल्या मोबाईल APP (ॲप) मध्ये निर्धारीत केलेल्या वेळेतच,शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, फोटो, मोबाईल नंबर नोंदविण्यात यावा, शिवभोजन तयार करणा-या व्यक्तींनी शिवभोजन तयार करण्याआधी त्यांचे हात कमीत कमी 20 सेंकद साबणाने स्वच्छ धुवावेत, त्याकरीता शिवभोजन चालकाने शिवभोजन उपलब्ध करुन देताना ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करुन द्यावेत,  शिवभोजनाची सर्व भांडी निर्जूंतक करुन घ्यावीत, तसेच भोजनालय चालकांनी त्यांचे भोजनालय दररोज निर्जूंतक करुन घ्यावेत, शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत, शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा, शिवभोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकामध्ये कमीत कमी तीन फूट (एक मीटर) अंतर राहील याची दक्षता घ्यावी, शिवभोजनाच्या प्रति थाळीसाठी लाभधारकाकडून 5/- रुपये इतकी आकारणी करावी.  पुढील तीन महिन्यापर्यंत याच दराने शिवभोजन थाळीचा दर असेल, करोना विषाणू प्रादूर्भावामुळे जे लोक (परराज्यातील कामगार, मजूर) स्वत:च्या जेवणाची सोय करु शकत नाहीत.  त्यांना शिवभोजनाचा लाभ प्राधान्याने द्यावा.  यासाठी तालुक्यातील प्रशासकीय तसेच पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी, कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरीत, बाहेरगावचे विदयार्थी उपाशी रहाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या आणि या सूचनांचे शिवभोजन केंद्रचालकांकडून  व्यवस्थित पालन होत असल्याचेही दिसून येत आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक