जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) नुसार मनाई आदेश लागू


वृत्त क्रमांक 123                                                                  दि.02 एप्रिल 2020

अलिबाग,दि.02 (जिमाका) : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात      दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
रायगड जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार प्राप्त अधिकारातून संहितेतील कलम 144 (1)(3) नुसार खालील सूचनांच्या अधिन राहून रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.31 मार्च 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम,सण,उत्सव,ऊरुस,जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा इ.यांना मनाई राहील.   
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा,कॅम्प,प्रशिक्षण वर्ग, बैठक,मिरवणूक, मेळावे,सभा,आंदोलने,देशांतर्गत व परदेशी सहली इ.यांचे आयोजन करण्यास मनाई राहील. 
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रात असणारी दुकाने,सेवा आस्थापना,शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स,सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब,पब,क्रीडांगणे,मैदाने, जलतरण तलाव,उद्याने,सिनेमागृहे, नाट्यगृह, शाळा, महाविद्यालये,खाजगी शिकवणी वर्ग,व्यायामशाळा,संग्रालये,व्हिडीओ पार्लर,ऑनलाईन लॉटरी सेंटर, ब्युटी पार्लर, सलून इ.बंद राहतील. 
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रात असणारी सर्व परमिट रुम,बिअर बार,वाईन शॉप,देशीदारुची दुकाने,लाईव्ह ऑर्केस्ट्रो, सोशल क्लब, सेतू केंद्रे, आधार केंद्रे, सीएससी केंद्रे,नोंदणी विभाग तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट, वाहन नोंदणी दि.14 एप्रिल 2020 रोजीपर्यंत बंद राहतील. 
जिल्ह्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.  या प्रार्थना स्थळांमध्ये परंपरेनुसार केली जाणारी नियमित पूजा-अर्चा, धार्मिक विधी तीन किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास मान्यता राहील.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रात कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली सर्व प्रकारची तीन चाकी वाहन,हलकी वाहने,मध्यम वजनाची वाहने,रिक्षा, टॅक्सी (ॲप आधारित ओला,उबेर व तत्सम वाहनांसह),दुचाकी वाहने यांच्या वापरावर नागरी क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.
मात्र हे आदेश खालील बाबींकरीता लागू होणार नाहीत :- 
शासकीय,निमशासकीय कार्यालये,सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, बँका.  अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये,पॅथोलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना,सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय (ॲलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपथी),नर्सिंग कॉलेज, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, खाजगी व शासकीय सुरक्ष्‍ा रक्षक इ.  अंत्यविधी (या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी). 
अत्यावश्यक किराणा सामान,दूध/दूग्धात्पादने, फळे व भाजीपाला, मटन/चिकन/मासे विक्री दुकाने, मत्स्य व मत्स्यखाद्य, कृषीपूरक उत्पादने इ.वाहतूक,औषधालय (Chemist) व त्यांचे घाऊक विक्रेते (Holeseller),वितरक (Distributer), जीवनावश्यक वस्तू विक्री/वितरीत करण्यास,घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी राहील. 
सर्व हॉटेल,लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंट मध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील.   
इ.10 वी व इ.12 वी तसेच राज्य  व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा,विद्यापीठ/विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक व्यक्ती.  
ज्या आस्थापना (उदा.माहिती व तंत्रज्ञान उद्योग,Major Port,Import-Export करणारे उद्योग,Petrochemical,Fertilizers उद्योग इ.)ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्वाच्या (Critical-National&International Infrastructure) उपक्रमांची जबाबदारी आहे व या आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रकियेला बाधा येऊ शकते. 

ज्या कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया अखंडीत चालू राहणे (Continuous Processing Industry) अनिवार्य आहे, अशा सर्व कंपन्या, मॅन्युफॅक्चरींग अँण्ड प्रॉडक्शन कंपनी,खाद्य, मेडिकल उपकरण, औषधे इ.चे उद्योग तसेच त्यांना कच्चा मालाचा (Raw Material) पुरवठा करणाऱ्या त्यांची उपउत्पादने करणाऱ्या कंपन्या व त्यांच्या Pakaging करणाऱ्या सर्व कंपन्या कार्यान्वित राहू शकतील.  या आस्थापनेमधील व पेट्रोलियम पदार्थ, कच्चे खनिज तेल (Crud Oil) साठवणूक करणाऱ्या गोदामांमधील यंत्रसामुग्री दुरुस्ती व देखभाल, कंपनी परिसरात रखवाली व साफसफाई करणेकामी कमाल दोन वाहने व जास्तीत जास्त वीस इतके कर्मचारी (वाहनचालकासहीत) यांना कपंनीमध्ये प्रवेश देण्यास या आदेशान्वये मुभा देण्यात आली आहे.  बंद औद्योगिक कंपन्यामध्ये आवश्यकतेनुसार कर्मचारी यांना (कमाल 20) प्रवेश  करण्यास मुभा राहील. 
प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टिव्ही न्यूज चॅनेल इ.) कार्यालये व त्यांची वाहने चालू राहतील. 
पूर्वनियोजित विवाह समारंभ (25 पेक्षा जास्त उपस्थिती असू नयेत). 
घरपोच दिल्या जाणाऱ्या  सेवा उदा.ॲमेझॉन, फ्लिप कार्ट,बिग बास्केट, किराणा सामान,LPG गॅस सिलेंडर इ.  मोबाईल कंपनी टॉवर, मोबाईल दुकाने संबंधित काम सुरु राहील. 
पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी व सरकारी संस्था, साफसफाई करणाऱ्या संस्था,त्यांच्या गाड्या व जनजागृती करणाऱ्या गाड्या दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या संस्था, विद्युत पुरवठा करणाऱ्या संस्था व ऊर्जा विभाग, बँकीग सेवा, आयटी सेवा व जीवनावश्यक पुरवठ्याशी निगडीत आहेत अशा सेवा वगळण्यात येत आहे. 
अँम्ब्युलन्स,वस्तूंची वाहतूक करणारी वाहने,सर्व प्रकारची अवजड वाहने, शेतीपूरक मालाची वाहतूक करणारी वाहने,टॅक्ट्रर्स, अग्निशामक दलाची वाहने इ.यांची वाहतूक सुरु राहील.  या बाबींकरीता वापरली जाणारी सर्व प्रकारची वाहने तसेच सवलत दिलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यावर असताना वापरात येणारी वाहने यांच्या वापरास परवानगी राहील.  तथापि या सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यासाठी ओळखपत्र व विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल. 
जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप सुरु राहतील.  तथापि नागरी क्षेत्रातील पेट्रोलपंपावर केवळ या कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे सूट दिलेल्या वाहनांना इंधन उपलब्ध करुन देता येईल.  इंधन देताना संबंधित वाहनचालकाकडून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे पेट्रोलपंप चालकांना बंधनकारक राहील.
हा आदेश पोलीस,आरोग्य सेवा व वस्तू यांची वाहतूक, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी  तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नाही. 
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती  भारतीय दंड विधान संहिता कलम 188,269,270,271 अन्वये फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती निधी चौधरी यांनी सूचित केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक