डॉक्टरांचा हात बाळाने घट्ट धरला होता..!


यशकथा क्र.4                                                                                              दिनांक :- 10/04/2020



अलिबाग शहरातील 32 वर्षीय गर्भवती महिला, नाव श्वेता केतन पाटील.  रात्री श्रीम.श्वेता यांना अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्याने त्या तातडीने डॉ.वाजे नर्सिंग होममध्ये दाखल झाल्या. त्या मधुमेहाच्या रुग्ण होत्या, मात्र त्यांची औषधं नियमितपणे चालू असल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात होते. गरोदरपणाचे 9 महिने श्रीम.श्वेता यांना पूर्ण झाले नव्हते परंतु यापूर्वी त्यांचे अगोदरचे (पहिले बाळ) प्रसूतीनंतर काही कारणास्तव दुसऱ्या दिवशीच दगावल्यामुळे तसेच यावेळीही पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालल्यामुळे डॉ. चंद्रकांत वाजे यांनी श्रीम.श्वेता यांचे तातडीने सिझरींग करण्याचा निर्णय घेतला. बाळाविषयी वेळीच खबरदारी घेता यावी म्हणून शहरातील प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनाही तात्काळ बोलाविण्यात आले. श्रीमती श्वेता यांचे यशस्वीपणे सिझर झालं, त्यांची तब्बेत व्यवस्थित होती. नुकतच जन्माला आलेलं बाळ रडलंही... पण थोड्या वेळातच हे बाळ काळ/निळं पडलं व बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. परिस्थिती अत्यंत गंभीर होती, क्षणाचाही विलंब न लावता बाळाला तातडीने एन.आय. सी. यू. मध्ये दाखल करण्याचा  डॉ. चांदोरकर यांनी निर्णय घेतला. 
सगळीकडे लॉकडाऊन, रस्त्यावर कुठलेही वाहन नाही, अशा बिकट परिस्थितीत कोणतेही वाहन मिळेना. बाळाची तब्येतही खालावत चाललेली पाहून डॉ. चांदोरकरांनी बाळ व बाळाची मावशी (जी स्टाफ नर्स आहे) यांना आपल्याच दुचाकी वाहनावरून त्यांच्या आनंदी हॉस्पिटल मध्ये आणून बाळावर तातडीने योग्य ते उपचार सुरु केले. काही वेळ बाळ ऑक्सिजनवर होते. डॉ.वाजे, डॉ.चांदोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयाने व झटपट केलेल्या कृतीने  आता हे बाळ एन. आय. सी. यू. मध्ये सुरक्षित आहे.
प्रसंगावधान ठेवून डॉ.चांदोरकरांनी त्या बाळाला तात्काळ आपल्या दुचाकी वाहनावरुन एन. आय. सी. यू.दाखल केले,त्यावर तातडीने आवश्यक ते उपचार केले आणि त्यामुळेच त्या बाळाचा जीव वाचला. डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ.राजेंद्र चांदोरकरांसारखे डॉक्टर्स अशी सेवा देताना पाहिले की ‘डॉक्टरांना पृथ्वीवरील देव का म्हटले जाते’ याची देही याची डोळा अशी प्रचिती येते.
बाळाच्या तब्बेतीची फेरतपासणी करतेवेळी डॉक्टरांचा हात त्या बाळाने घट्ट धरला होता..... तेव्हा  त्या बाळाच्या स्पर्शाने या कोविड 19 च्या संवेदनशील काळात डॉ.चांदोरकर यांना अक्षरश: गहिवरून आले.

                                                                                                      (मनोज शिवाजी सानप)
                                                                                                                 जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                                                  रायगड-अलिबाग
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक