मुक्या जीवा..घास द्यावा... मानूनी मानवता धर्म…सत्कर्म करावा..!





         करोनाच्या संकटाने संपूर्ण जग ग्रासले आहे. करोनाच्या नियंत्रणाकरिता शासनाला देखील संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करावा लागला.
         या अभूतपूर्व परिस्थितीत आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग अन् सर्वच अत्यावश्यक सेवा पुरवणारे विभाग आपल्यास लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू व सेवा पुरवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेतच.
परंतु आपल्या व्यथा शब्दात मांडू न शकणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी पशुसंवर्धन खातेसुद्धा अहोरात्र झटत आहे. अहो, पाळीव प्राण्यांना वाली आहे.. पण भटक्या, रस्त्यावर मोकाट फिरून खाणं शोधणाऱ्या प्राण्यांचं काय? जिथे माणसाचीच आबाळ झाली, तिथे ह्या मुक्या जीवांचं काय? आमच्यासाठी कोण? हा प्रश्न ह्या निरागस जीवांच्या डोळ्यांत पाहायला मिळतो.
        पशुपक्षी सुद्धा निसर्गाचा जीवसृष्टीचा अविभाज्य घटक आहे. त्यांचं अस्तित्व मानवजातीच्या प्रगतीसाठी जीवनासाठी आवश्यक आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकारामांच्या अभंगाची आठवण ठेवून सर्व प्राणी-पक्ष्यांची काळजी घेणं, हे मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे.
काळाची गरज ओळखून मोकाट जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करण्यासाठी नोंदणीकृत गोशाळा, सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांची मदत घेऊन या सत्कर्माचा विडा पशूसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकांनी,कर्मचाऱ्यांनी आणि काही स्वयंसेवी संस्थांनी  उचलला.
रायगड जिल्ह्यातील  दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, नोंदणीकृत गोशाळा हे देखील या अनाथ मुक्या जीवांच्या आर्त सादेला हाक देतील, हा विश्वास सर्वांनाच होता. पशुखाद्य, चारा वैरण, कुत्र्याचे खाद्य, अन्य खाद्य या स्वरूपात आपण आपले योगदान देऊ शकता… असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी   समस्त रायगडकरांना केले.
बघता बघता जिल्ह्यातील भटके कुत्रे, गाई, बैल व वासरे इत्यादी प्राण्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सुरु झाली. तालुकास्तरावर सहा.आयुक्त, पशुसंवर्धन (गट-अ), पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (गट-अ/ब), सहा.पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना  या कामाची,  समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली. 
जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, जिल्हास्तरीय प्राणी क्लेश समिती सदस्य व प्राणी मित्र तसेच प्राणी कल्याणाकरिता सतत झटणाऱ्या व्यक्ती मदतीसाठी  पुढे सरसावले, कंत्राटी कुक्कुट व्यावसायिक यांनीही वस्तू स्वरुपात मागणीनुसार मदत करण्यास संमती दर्शविली.
काही तालुक्यातील प्राणी मित्र संचारबंदीच्या काळात भटक्या कुत्र्यांना सायंकाळच्या वेळेस जेवण देवू लागले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कुरुळ येथील प्राणीमित्र श्री. धनंजय म्हात्रे हे अलिबाग कुरुळ वेश्वी गोंधळपाडा व परिसरातील रस्त्यावरील मुक्या भटक्या गाईंची अन् कुत्र्यांची काळजी  घेत आहेत.
पेणच्या श्रीमती सीमा शांतीलाल पुनमिया यांनी पंख फाऊंडेशनच्यावतीने मुक्या प्राण्यांची भूक शमवण्यासाठी फूड बँकची स्थापना केली आहे.  या पंख फाउंडेशनच्या ॲनिमल फूड बँकच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद  देत श्री.अमित जैन यांनी 51 चपाती, विजय शाह यांनी 500 रुपये दिले  तर अमित पेरवी यांनी श्वानांसाठी तीन दिवस पुरतील इतके बिस्किटस् चे दोन मोठे पॅकेट दिले.
माथेरान या पर्यटनस्थळी जवळपास 450 घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो.   जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून या घोड्यांसाठी डॉ.जयराम यांच्या मदतीने प्राथमिक स्वरुपात 300 किलो गोदरेज कंपनीचे पौष्टिक अश्वखाद्य वाटप करण्यात आले.
महाड येथील लघु पशू सर्वचिकित्सालय पशू व श्वानांसाठी प्राणीप्रेमींकडून खाद्य व चारा स्वयंस्फूर्तीने  उपलब्ध झाला.
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील कूकूच..कू पोल्ट्री यांनी अलिबाग येथील घोड्यांची उपासमार होवू नये म्हणून 150 किलो मका भरडा वाटप केले. 
रेवदंडा येथून जैन समाजाकडून घोड्यांसाठी एकूण 1 हजार किलो  खाद्य तसेच अलिबाग जैन समाज यांच्याकडून एकूण 9 हजार  किलो खाद्य मिळाले.
श्री शांती नाथ श्वेतांबर जैन संघ,अलिबाग यांनी 3.0 टन खाद्य घोड्यांसाठी  वाटप करून पशूंच्या जीवाविषयीची काळजी दाखवून दिली.
याचप्रमाणे श्री शांती नाथ श्वेतांबर जैन संघ,  रेवदंडा  यांनीही रस्त्यावरील  भटक्या  गायींसाठी  एकूण 200 किलो चुनी अन् 100 किलो सरकी पेंड वाटप केली. जैन संघ, रेवदंडा यांनी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2  चौल भवाळे  येथे 300 किलो  गहू भुस्सा, 300 किलो कुट्टी अन् 100 किलो चना चून वाटप केले.
किहीम येथील घोडागाडीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या घोड्यांसाठी 500 किलो गहू भुस्सा अलिबाग येथील जैन समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळाले.
या सर्व समन्वयासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशूसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांच्यासह डॉ. डी. बी. डुबल, डॉ. एम. व्ही. खवसकर, डॉ. कैलास चौलकर या त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकही मुका जीव उपाशी राहणार नाही,असा जणू पणच केला. मुक्या प्राण्यांची वेदना ओळखणाऱ्या एका मनाने या अबोल भावना जाणवणाऱ्या दुसऱ्या मनाला प्रांजळपणे केलेली ही प्रार्थना आहे.
राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात शासन, प्रशासन मिळून माणसांची काळजी घ्यायला कुठेही कमी पडत नाही. परंतु जे आपल्या मुखातून काहीच बोलू शकत नाही फक्त डोळ्यांमधील भावच त्यांच्या भावना पोहचवू शकतात अशा मुक्या जीवांचीही काळजी प्रशासन घेतंय. प्रशासनाच्या हाकेला ओ देऊन या मुक्या जीवांची काळजी घेणाऱ्या या सर्व दानशूर प्राणीमित्र व्यक्तींचे, संस्थांचे  त्यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल  मानावे तितके आभार कमीच आहेत…!
                                                                                                            (मनोज शिवाजी सानप)
                                                                                                                 जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                                                         रायगड-अलिबाग

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक