जिल्ह्यातील कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही -जिल्हाधिकारी निधी चौधरी


अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका) : करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल, मे व जून 2020 मध्ये दरमहा नियमित योजना निहाय अन्नधान्य वितरीत करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ माहे एप्रिल, मे व जून 2020 महिन्यात दरमहा त्या-त्या महिन्यात वितरण करणाचे शासनाचे निर्देश आहेत.
              राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठीही शासनाने प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांसाठी दरमहा त्या त्या महिन्यात वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
              रायगड जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब  शिधापत्रिकाधारकासाठी दरमहा वितरीत करावयाच्या शिधा जिन्नसाची माहिती पुढीलप्रमाणे आहे-पिवळी शिधापत्रिका (अंत्योदय शिक्का) व केशरी शिधापत्रिका (प्राधान्य कुटूंब शिक्का) असलेल्या पात्र लाभार्थ्यांना माहे एप्रिल, मे व जून 2020 साठी अन्नधान्य- अंत्योदय लाभार्थी (नियमित), तांदूळ-25किलो प्रति कार्ड, गहू-10किलो प्रति कार्ड, दर (प्रति किलो), तांदूळ-3/- रु., गहू-2 रु.. प्राधान्य लाभार्थी (नियमित), तांदूळ- 3 किलो प्रति व्यक्ती, गहू-2 किलो प्रति व्यक्ती, तांदूळ- 3/- रु., गहू-2 रु.. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य लाभार्थीसाठी मोफत अन्नधान्य (तांदूळ), 5 किलो प्रति व्यक्ती-मोफत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रति शिधापत्रिका 1 किलो साखर शासन अनुदानित दर रु.20/- प्रति किलो दराने नियमित वितरीत करण्यात येते.
एपीएल केशरी लाभार्थ्यांना माहे मे व जून 2020 साठी - एपीएल केशरी लाभार्थी, तांदूळ-2 किलो प्रति व्यक्ती, गहू-3 किलो प्रति व्यक्ती, तांदूळ-12/- रु., गहू-8 रु.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत  अंत्योदय व प्राधान्य कुटूब योजनेमध्ये अन्नधान्य घेण्यासाठी पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय पिवळी व प्राधान्य केशरी कुटूंबातील शिधापत्रिका देण्यात आलेली आहे. परंतु ज्यांचे शिधापत्रिका अद्यापही ऑनलाईन आधार सिडींग झालेली नाही, त्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे सर्व सदस्यांचे आधार क्रमांक तहसिल कार्यालयात जमा करुन RCMS वेबसाईवर ऑनलाईन करून घ्यावी.
शिधापत्रिकेची ऑनलाईन आधार सिडींग झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ऑनलाईन दिसते व ऑनलाईन बारा अंकी  शिधापत्रिका क्रमांक मिळतो. त्यानंतर पात्र शिधापत्रिकाधारकांना योजना निहाय अन्नधान्य वितरण करता येते. कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबतची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना दिलेले आहेत.
तसेच सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन करुन ( 2 व्यक्तीमध्ये कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेऊन उभे राहावे. पात्र असलेल्या योजनेचे शासन अनुदानित अन्नधान्य शासनमान्य दराने प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक