लॉकडाऊनच्या काळात जे.एस.डब्ल्यू च्या नवी मुंबई,वाशी,पनवेल कर्मचाऱ्यांनी घरीच थांबण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे आवाहन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना दिले पत्र


वृत्त क्रमांक:-151                                                                                        दि.10 एप्रिल 2020


            अलिबाग, रायगड,दि.10 (जिमाका)–करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सध्या राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरु आहे.  पनवेल परिसर वगळता रायगड जिल्ह्यात इतरत्र कोठेही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.  ही चांगली बाब आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयात जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
                 केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील जे.एस.डब्ल्यू स्टिल लि.कंपनीचे डोलवी-पेण व साळाव-मुरुड येथील प्लँट सुरु आहेत. या कंपनीमध्ये काही स्थानिक कामगार आहेत तर काही कर्मचारी/कामगार नवी मुंबई, वाशी, पनवेल व इतर ठिकाणांवरुनही कामावर येत आहेत.  कामाच्या ठिकाणी या कामगारांचा एकमेकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे अनेक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकही त्यामुळे भयभीत झालेले आहेत.  कंपनीमध्ये काम करीत असताना करोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सांगितलेल्या  सर्व नियमांचे जरी पालन  करण्यात येत असले तरी काही वेळा त्यांची योग्य अंमलबजावणी होईलच, अशी  खात्री कामगारांना नाही.  त्यामुळे कामगारांमध्ये दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. वाशी, पनवेल,नेरुळ, नवी मुंबई येथून कंपनीमध्ये येणाऱ्या कामगारांनी सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. नवी मुंबई परिसरात करोना रुग्ण आढळल्याने लॉकडाऊनच्या काळात त्यांनीही आपल्या घरी थांबणे, त्यांच्यासाठी व त्यांच्या परिवारासाठी हितकारक आहे. 
                 जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचीही या विषयी त्वरित निर्णय घेण्याविषयीची मागणी असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच राज्यमंत्री, उद्योग  व खनिकर्म  या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना लेखी पत्राद्वारे जिल्ह्यासह,राज्यातील अशा कंपन्यांमध्ये काम करीत असलेल्या स्थानिक कामगार व इतर कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना  घरीच राहण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, असे कळविले आहे.
            लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असेही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगडकरांना आश्वस्त केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक