स्वदेस फाऊंडेशनकडून 25 स्थलांतरीत आदिवासी कुटुंबांना अवघ्या काही तासात 1 महिन्याच्या रेशन व किराणा सामानाची मदत



     
            अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील वाई येथून महाड ग्रामपंचायत दहिवड येथील 114 रहिवासी आदिवासी वाडीत  दि.27 एप्रिल रोजी 200 कि.मी.चा  प्रवास करुन चालत पोहोचले होते. महाड तहसिलदार चंद्रसेन पवार यांच्या आदेशानुसार या  रहिवाशांना महाड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्या वाडीवरच त्यांचे विलगीकरण करण्यात आले होते. 
           तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी या 25 कुटुंबांना अन्नधान्याबाबत तात्काळ मदत करण्यासाठी स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड  किल्ल्याच्या पायथ्याशी आदिवासी वाड्यांमध्ये  रेशन, किराणा वाटप  करीत असलेल्या समन्वयक मंगेश कुंभार  यांच्याशी संपर्क साधला. 
स्वदेसचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांनी लागलीच महाड तहसिलदार चंद्रसेन पवार व स्वदेस कोविड-19 टास्क फोर्स यांच्याबरोबर चर्चा केली. या कुटुंबांना तात्काळ मदत पोचविण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वदेस  टास्क फोर्स मधील बिजॉय चिरामेल, समीर डिसुझा, डॉ.सुरेंद्र यादव व नीता हरमलकर यांनी मदत पोहोचविण्यासाठी  पुढील कार्यवाही सुरु केली.  नीता हरमलकर यांनी व्यवस्थापक मुरली कासार यांच्याकडून कुटुंबांची यादी  मागवून घेतली. बिजॉय चिरामेल यांनी व्यवस्थापक  शिवतेज ढऊळ यांना 25 रेशनिंग किट तयार करायला सांगितले,  शिवतेज ढऊळ यांनी किट तयार करून मंगेश कुंभार यांच्याकडे तात्काळ पाठविण्याची व्यवस्था केली .
 अशा प्रकारे या  25  आदिवासी कुटुंबांतील 114 लोकांना  दुपारी  2.30 वाजता एक महिना पुरेल इतके रेशन साहित्य,किराणा सामान दहिवड मधील आदिवासीवाडी येथे प्रत्यक्ष  जाऊन  मंगेश कुंभार यांनी  पोहोच केले. स्थानिक प्रशासन आणि स्वदेस फाऊंडेशनने  केलेल्या या मदतीमुळे येथील ग्रामस्थ खूप आनंदित झाले.
           शासनाच्या आवाहनाला स्वदेस फाऊंडेशनने केवळ तीन तासांमध्ये दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे एक महिन्याचे रेशन व किराणाचे साहित्य त्या आदिवासी कुटुंबांना पोहोच होऊन त्यांची उपासमार टळल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, महाडचे तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी स्वदेस फाऊंडेशनचे विशेष आभार मानले आहेत.
रॉनी  व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशन आतापर्यंत रायगड जिल्ह्यामधील सात तालुक्यांमधील 8 हजार 29 गरजू आदिवासी कुटुंबांना एक महिन्याचे रेशन व किराणा साहित्याचे वाटप केले आहे. त्याच प्रमाणे यापूर्वीही स्वदेस फाऊंडेशनने आरोग्य यंत्रणेशी संबंधित असलेले उपकरणे व संसाधने यांची मदत देऊन प्रशासनाला मोठे सहकार्य केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक