अलिबागचे घोडे आणि गाईंच्या मदतीसाठी सरसावला श्री अलिबाग कच्छीविसा ओसवाल जैन संघ



अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका) : जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक बाबीखाली दूध, मटन,अंडी,जनावरांचे खाद्य, वैरण आणि पशुवैद्यकीय दवाखाने, पेटशॉप या बाबींचाही समावेश आहे.  पशूपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा, त्यांच्याकडील उत्पादित केलेले दूध, मटन,अंडी इत्यादींना मागणी असल्याने बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड डॉ.सुभाष म्हस्के यांना प्राधिकृत केले आहे.
या पार्श्वभूमीवर श्री अलिबाग कच्छीविसा ओसवाल जैन संघ, अलिबाग या दानशूर संस्थेकडून  अलिबाग समुद्र किनारी घोडागाडी व्यवसाय करणाऱ्या तथापि सध्या संचारबंदीमुळे पर्यटन पूर्णत: ठप्प झाल्याने घोड्यांची उपासमार होवू नये, या उदात्त हेतूने एकूण 750 किलो चना चून, 750 किलो कुट्टी तसेच रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट गायींसाठी 500 किलो तूर चूनी अलिबाग उपविभागीय अधिकारी श्रीमती शारदा पोवार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले यांच्या हस्ते नुकतेच वाटप करण्यात आले.
            यावेळी अलिबाग समुद्र किनारी घोडागाडी व्यवसाय करणारे सर्व घोडागाडी मालक-पालक, श्री अलिबाग कच्छीविसा ओसवाल जैन संघ, अलिबागचे  अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, अन्य सदस्य तसेच मुक्या प्राण्यांसाठी सेवा करणाऱ्या संस्थांचे सदस्य, पशुसेवा करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रभारी सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन डॉ. धनंजय बा. डुबल, , पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. मेघा खवसकर, पशुधन पर्यवेक्षक श्री. कैलास चौलकर,श्री. सुहास जोशी यांनी  विशेष प्रयत्न केले.
राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात सर्व दानशूर प्राणीमित्र व्यक्तींचे, संस्थांचे त्यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी  श्रीमती निधी चौधरी व यांनी आभार मानले असून जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनीही मदतीसाठी असेच पुढे यावे, असे आवाहन केले आहे. 
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक