करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करीत पावसाळ्यापूर्वीची कामे सुरु करण्यास जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली परवानगी



अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका)  : जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊन कालावधीच्या अनुषंगाने दि.20 एप्रिल पासून काही बाबी, उपक्रम चालू करण्यास परवानगी देण्यात आलेली होती. याशिवाय पावसाळ्यापूर्वीच्या कामांची सुरुवात करण्यासही जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी परवानगी दिली आहे.
पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक स्वरूपाच्या कामकाजासाठी परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून MMR Region  मधील तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी व इतर क्षेत्रांसाठी संबंधित तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना आवश्यक साहित्य जसे की सिमेंट, खडी, स्टील, हार्डवेअर इत्यादी वस्तूंची आवश्यकता असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज प्राप्त होत आहेत. हे साहित्य उपलब्ध होण्यासाठी अशा प्रकारची साहित्य निर्मिती करणारे कारखाने व अशा प्रकारचे साहित्य पुरविणारे ठोक व किरकोळ विक्रेते अशी संपूर्ण पुरवठा साखळीशी संबंधित दुकाने उघडणे आवश्यक आहे.
याकरिता पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे करण्यासाठी सिमेंट, खडी, डांबर, आर.एम.सी. प्लँट, लोखंड पुरवठादार, हार्डवेअर इत्यादी, पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्य निर्मितीचे कारखाने, हे साहित्य विक्री करणारे घाऊक, पुरवठादार दुकाने सुरू करण्याकरिता पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वरील साहित्यांची उत्पादन/निर्मिती करणाऱ्या कंपन्या/कारखानदारांनी www.permission.midcindia.org या संकेतस्थळावर  नोंदणी करणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावरून वाहनांसाठी पासेस घेण्यात यावेत. याबाबत मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कंपन्या/ कारखानदारांनी कामकाज सुरू करावे व या कंपन्या/कारखाने सुरू ठेवण्यासाठी पुढील अटी व शर्ती लागू राहतील-
जिल्हाधिकारी रायगड व आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोन (प्रतिबंधात्मक क्षेत्र)मधून कामगारांची ने-आण करण्यास प्रतिबंध राहील. ज्या कंपन्यांना/कारखान्यांना परवानगी मिळालेली आहे, त्यांचे कामगार, अधिकारी/कर्मचारी यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था मालकांनी करावी. कामगारांची वाहतूक एकदाच करण्यास परवानगी राहील. कामाच्या ठिकाणी कामगारांनी शारीरिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायजर वापरणे, साबणाने हात वारंवार धुणे बंधनकारक राहील. कामगारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे, हॅण्ड सॅनिटायजर, हॅण्ड वॉश इत्यादी सुविधा कामगार, अधिकारी-कर्मचारी यांना पुरविणे, मालकांना बंधनकारक राहील. या कंपन्यांनी/मालकांनी गोडाऊन/दुकानांमधील एकूण कामगारांच्या कमीत कमी कामगारांच्या उपस्थितीत पुरवठा कामे करावीत.  माल घेण्यास येणाऱ्या ग्राहकांसाठी गोडाऊन/दुकानाबाहेर उभे राहण्यासाठीचे ठिकाण निश्चित करून ते ठळक रंगांमध्ये आखण्यात यावे.काम करणारे कामगार हे जिल्हाधिकारी रायगड, आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांच्या आदेशान्वये घोषित केलेल्या करोना बाधित क्षेत्रांमधून कुठल्याही परिस्थितीत आलेले नसावेत. भविष्यात या कामाचे क्षेत्र करोना बाधित क्षेत्र घोषित झाल्यास ही परवानगी आपोआप रद्द होईल. आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागाच्या आदेशानुसार विहीत कार्यपद्धतीनुसार संपूर्ण कार्यवाही करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक