खा. सुनिल तटकरे यांचा डिजिटल माध्यमातून संवाद फेसबुक लाईव्हद्वारे केले रायगडवासियांना आश्वस्त नेटकऱ्यांच्या अनेक शंकांचे झाले निरसन




अलिबाग,जि.रायगड.दि.6 (जिमाका) – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या खास शैलीत रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. या संकटाचा बिमोड करण्यात काही देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आपणही आत्मविश्वासाने व संयमाने याचा सामना करीत या भयावह परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी नेटकऱ्यांना दिला.
मुंबईत अडकलेल्या कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यांना खा. तटकरे यांनी योग्य व दिलासादायक मार्गदर्शन केले. सगळ्यांना आपल्या मूळ गावी त्यांच्या घरी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पण हे काम टप्प्याटप्प्याने होईल, असा विश्वास त्यांनी रायगडवासियांना दिला. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक नागरिक परतले असून त्यांना क्वारंटाईन करून आपापल्या गावी पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शेतकरी, आंबा, काजू, सुपारी उत्पादक तसेच मच्छिमारांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, त्यासाठी राज्य सरकारकडे आपण सातत्याने पाठपुरावा करीत असून लहान-लहान व्यापारी, उद्योजकांचेही प्रश्नही मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे खा.श्री.तटकरे यांनी सांगितले. 
रायगड जिल्ह्यातील काही भाग ऑरेंज झोन असल्याने त्या भागातील दुकाने, व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र हे करताना सुरक्षिततेचे सगळे नियम काटेकोरपणे पाळले जायलाच हवेत, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच अनेक तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये स्वयंस्फूर्तीने तीन-चार दिवसांचा बंद पाळण्यात येत आहे, परिस्थितीनुरुप  हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल असल्याचे ते म्हणाले.
काही नेटकऱ्यांकडून बॅंकेच्या कर्जाच्या हप्त्यांबद्दल तक्रार आली असता खा. तटकरे यांनी संपूर्ण माहिती पाठविण्याच्या सूचना केल्या. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाबाहेर जर एखादी बॅंक काम करीत असेल तर त्या बँकेवर नक्कीच कारवाई करण्याची मागणी करु, असे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असल्याचेही खा. सुनिल तटकरे यांनी नमूद केले. आज या महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खा.सुनिल तटकरे यांनी रायगडवासियांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधलेल्या या संवादाबाबत  अनेक नेटकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले. नेटकऱ्यांच्या अनेक शंकाचे या संवादातून निरसन झाले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक