पालकमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथे कोविड केअर सेंटरबाबत घेतला आढावा




अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका) : संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोविड 19 करोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी  व धैर्याने सामना करण्यासाठी संपूर्ण राज्याने कंबर कसली आहे .   
     पालकमंत्री कु.आदिती तटकरे नियमितपणे रायगड प्रशासनाशी तसेच रायगडच्या जनतेशी संपर्क ठेवून आहेत. श्रीवर्धनच्या आमदार तसेच रायगडच्या पालकमंत्री नात्याने त्या वेळोवेळी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जावून करोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. तसेच जनतेला लॉकडाऊन काळात गैरसोय होऊ नये, याची काळजी घेत आहेत.
   आजमितीला श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण नसल्याने श्रीवर्धनवासियांसाठी समाधानाची बाब असली तरी मुंबईसह इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या मूळ रहिवाशी लोकांकडून किंवा इतर कारणांनी पुढील काळात कोरोनाचा शिरकाव श्रीवर्धनमध्ये झालाच तर त्यासाठी उपाययोजना म्हणून करोना केअर सेंटर उभारण्याच्या सूचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन प्रशासनाला दिल्या होत्या. त्यादृष्टीने त्यांनी आज श्रीवर्धनला भेट देऊन श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. एन. पवार, तहसिलदार सचिन गोसावी,  वैद्यकीय अधीक्षक डॉ.मधुकर ढवळे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, मुख्याधिकारी किरण मोरे, गटविकास अधिकारी तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांची सोशल डिस्टंसिंग पाळत बैठक घेऊन आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या.
     बैठक संपल्यानंतर कु.आदिती तटकरे यांनी उभारल्या जाणाऱ्या कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी डॉक्टर्स व पोलिसांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, जेवणाची उत्तम सोय व्हावी याकरिता किचन असावे, सॅनिटायझेशन करण्यात यावे तसेच रूग्णांच्या तपासणीकरीता स्वतंत्र आरोग्य तपासणी कक्ष तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिल्या.
००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक