जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी संबंधी कामकाज सुरु




अलिबाग,दि.9 (जिमाका) : करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या अधिन राहून तसेच करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक श्रीमती निधी चौधरी यांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी, ऑनलाईन दस्त नोंदणीसंबंधी कामकाज पूर्ववत सुरु करण्यात आले असून दस्त नोंदणी  करुन इच्छिणाऱ्या नागरिकांनी व वकील इत्यादींनी पुढील सूचनांचे पालन करावे.
दस्त नोंदणीसाठी igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ई-स्टेप इन या सुविधेद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील.  पक्षकार व वकील इत्यादींनी दस्त नोंदणीसाठी आरक्षित वेळेतच दुय्यम निबंधक कार्यालयात यावे.  दुय्यम निबंधक कार्यालयात प्रवेश करताना मास्क, फेस कव्हर असणे आवश्यक आहे.  तसेच मुख्य प्रवेशद्वारावरील मशीनवर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझिंग करावे ,थर्मल स्कॅनिंग करुन घ्यावे.  सर्व पक्षकार, वकील व कर्मचारी यांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केलेले असणे अनिवार्य राहील.   दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ दस्त, स्वत:चा पेन, शाई पॅड व इतर कागदपत्रे सोबत आणता येतील.  बॅग, पर्स इत्यादी आणता येणार नाही.  सोशल डिस्टन्सिंग संबधी सर्व निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे, पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित जमू नये. एकावेळी एकच दस्तातील पाचपेक्षा अधिक पक्षकारांना (वकिलासह) कार्यालयात एकत्रित थांबता येणार नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 चा भंग होणार नाही,याची सर्वांनी दक्षता घ्यावी.  कार्यालयात विनाकारण प्रवेश करु नये, रेंगाळू नये, कार्यालय परिसरात थुंकल्यास दंड केला जाईल.  सर्वसाधारण चौकशी, दस्त नोंदणीसंबंधी माहिती यासाठी सारथी हेल्पलाईनचा (8888007777) वापर करावा किंवा सह जिल्हा निबंधक कार्यालय अलिबाग यांच्याशी (02141-222265)या क्रमांकावर संपर्क साधावा.  कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी  शोध, नक्कल, मूल्यांकन ही कामे तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहेत.  नागरिकांना या सेवा विभागाच्या igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  मृत्यूपत्र, वाटणीपत्र या नोंदणी वैकल्पिक असलेल्या तसेच हक्क सोडपत्र, नात्यातील बक्षीसपत्र, चूकदुरुस्तीपत्र यासारखे कमी महत्वाचे दस्त सद्य:स्थितीत नोंदणीसाठी आणू नये.
      सद्य: परिस्थिती विचारात घेऊन पक्षकार व वकील इत्यादींनी वरील सूचना व इतर निर्देशाचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. शैलेंद्र साटम यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक