नूतन प्रशासकीय इमारतीतून जनतेची सेवा घडावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन संपन्न




अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका) : खोपोली नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीतून जनतेची सेवा घडावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
खोपोली नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या ई-उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्षा सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, उप नगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी गणेश शेटे हे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव विकास खारगे, आशिष सिंह, जिल्हाधिकारी निधी चौधरी हे ऑनलाईन उपस्थित होते.
 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खोपोली आणि रमाधाम वृद्धाश्रमाशी असलेल्या जुन्या नाते संबंधांचा विशेष उल्लेख करुन पुढे म्हणाले, रायगड जिल्ह्याचा झपाट्याने विकास होतोय. नागरीकरण वाढतंय, अनेक उद्योग जिल्ह्यात येत आहेत, नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय.  ट्रान्सहार्बर लिंकमुळे उरण, पनवेल, खोपोली हा सगळा परिसर मुंबईच्या जवळ येणार आहे.  यामुळे या परिसराचा आणखी झपाट्याने विकास होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये खोपोलीही बदलणार आहे.  या बदलांना सामोरं जात असताना विकासाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी खोपोलीच्या लोकप्रतिनिधींवर आणि प्रशासनावर आहे.  
 सध्या करोनामुळे सर्वांसमोर विविध अडचणी आहेतच. मात्र या पार्श्वभूमीवर खोपोली नगरपरिषदेने ज्याप्रमाणे अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून मुख्यालयाची प्रशस्त आणि देखणी इमारत देखील बांधून घेतली.  पैशाचं सोंग आणता येत नाही, पण अशा प्रकारे कायद्याच्या चौकटीत राहून जनतेच्या सेवेकरिता या नवीन इमारतीला उभे केले.  ही प्रशासकीय वास्तू म्हणजे लोकशाहीचे मंदिर असून ,यात येणारी जनता परमेश्वर आहे. जनतेला देव मानून त्यांची उत्तम सेवा होईल, अशा पध्दतीने कामकाज करा, असे सांगून या नूतन कार्यालयातून खोपोलीतील जनतेची खऱ्या अर्थाने सेवा व्हावी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कामकाज व्हावे, अशी सदिच्छाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी शेवटी व्यक्त केली. 
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना खोपोली नगरपालिकेच्या या  उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विकास कामे व अन्य प्रस्तावित  प्रकल्पांसाठी आवश्यक निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, हे स्पष्ट केले.
प्रास्ताविकानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी मनोगत व्यक्त करताना खोपोली नगरपरिषदेच्या या नव्या वास्तूची निर्मिती कशा प्रकारे झाली, याविषयीची सविस्तर माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी केले तर आभार नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही खोपोलीवासियांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला खोपोली नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी  तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले.  
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक